*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याबाबतचे निवेदन करमाळा येथे ना.तहसीलदार विजयकुमार जाधव यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच " पात्र " शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंत पीक कर्जमाफी जाहीर केलेली आहे, परंतु शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी बरोबरच सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे गरजेचे आहे. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी ही आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब हे केंद्रीय कृषिमंत्री असताना केली गेली होती. निवडणुकांपूर्वी सध्याच्या सरकार मधील लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांचा कर्ज असलेला ७/१२ उतारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, हे आश्वासन पूर्ण करणे गरजेचे असताना देखील ते पूर्ण केले जात नाहीत. याची आठवण करून कर्जमाफीचे निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी करमाळा तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष अमरजीत साळुंखे यांनी सांगितले.
पुढे बोलताना श्री साळुंखे म्हणाले भारत देश हा कृषी प्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेती वरती अवलंबून आहे. वर्षानुवर्षे शेतकरी हा काबाडकष्ट करत आहे, तरी देखील त्याच्या डोक्यावरचे कर्ज काही कमी होताना दिसत नाही. त्याचे कारण म्हणजे शेती पिकाच्या उत्पादन खर्चातील व पिकांच्या दरातील असमतोल आहे. करमाळा तालुक्यातील शेतकरी हा मागील कित्येक वर्षांपासून अनंत अडचणींचा सामना करत आहे. सन २०१९ मध्ये कोरोना सारख्या महामारीत देखील शेतकऱ्यांना प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागलेले आहे. त्यानंतर दुष्काळ सदृश परिस्थिती, २०२५ मधील करमाळा तालुक्यातील अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेला महापूर असेल किंवा आताची २०२६ मधील युद्धजन्य परिस्थिती असेल या सर्व घटनांमुळे करमाळा तालुक्यातील सर्वच शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आर्थिक अडचणीत आहेत.
यामुळे तालुक्यातील बाजारपेठेवरती देखील त्याचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. या सर्व घटनांमुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये शाश्वत असे कोणतेच उत्पन्न पडत नाही, परिणामी पतपेढ्यांचे कर्ज खाजगी सावकारांचे कर्ज या चक्रात शेतकरी अडकला जातोय. त्यामुळे पुन्हा पुन्हा शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत येत आहे. या सर्व घटकांचा विचार करता शेतकऱ्यांना संपूर्ण आणि सरसकट कर्जमाफीची अत्यंत गरज आहे, त्याचा शासनाने योग्य आणि सकारात्मक विचार करावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रचंड रोशाला सरकारला सामोरे जावे लागेल व सरकार विरोधात तीव्र आंदोलन उभारावे लागेल असेही तालुका अध्यक्ष श्री साळुंके यांनी सांगितले आहे.
यावेळी महेश पाटील, नीलेश झोळ, संतोष पाटील, शरद नेटके, रा.काँ.सामाजिक न्याय ता. अध्यक्ष शिवाजी जाधव, रा.काँ.सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे, मल्हारी कळसे, बाळासाहेब गिरमकर, महेश वीर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा