Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

*नाशिक रोड ऋतुरंग भवन मध्ये ह.भ.प रामायणाचार्य डॉ. संजय सिताराम गीते महाराज लिखित 'रानफुल' या काव्य संग्रहाचे दिमाखात प्रकाशन, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अन्नदाता बळीराजाचे सबलीकरण करण्याचा काव्यसंग्रहातून संदेश.*

 *पुणे, डॉ. संदेश शहा*.

*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*



काळी माती माझी आई, वाढलो पोसलो मी तिच्या ठाई, तिजविण मला नाही तारु, जीव तिच्यावीण वाऱ्या वारू, आठवता येते डोळा पाणी, माथी चंदन तिचा, कर जुळे दोन्ही अशी हृदयस्पर्शी काव्यरचना असलेल्या 

पुणे येथील साहित्यिक तथा रामायणाचार्य डॉ.  संजय सिताराम गीते लिखित रानफुल या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. ११ एप्रिल रोजी नाशिक रोड येथील ऋतुरंग भवन मध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यानिमित्त आयोजित कवी संमेलनात ३० हून जास्त आबालवृद्ध कवींनी आपल्या काव्य रचना सादरीकरण करून कार्यक्रमाची गोडी वाढवली. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षा लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ. जयश्री वाघ, पुणे येथील आंतरराष्ट्रीय धावपटू पद्मश्री नरहरी कडेकर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. संजय पवार, डॉ. विकास ओझर्डेकर, विठ्ठल रहाणे यांच्या हस्ते रानफुल या खंडकाव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. 



यावेळी अध्यक्षा सौ. जयश्री वाघ म्हणाल्या,

रानफुल हा काव्यसंग्रह शेतकऱ्यांच्या मानस व  जीवनपटावर प्रकाश टाकणारा ग्रामजीवनाची काव्यगाथा आहे. शेतकऱ्यांच्या भाव भावना आणि व्यथा या रानफुल काव्य संग्रहातून अत्यंत हळव्या शब्दात मांडल्या आहेत. शेतकरी हा जगाचा पोशिंदा मायबाप बळीराजा असून त्याला नेहमी अस्मानी व सुलतानी संकटाना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचे सबलीकरण होणे ही काळाची गरज आहे. डॉ. संजय गीते यांनी काव्यातून शेतकरी व्यथा मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न केला असून त्याची दखल मायबाप सरकार सह सर्वजण घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

यावेळी डॉ. संजय गीते म्हणाले, आपणा सर्वांचे आराध्य दैवत प्रभू श्री राम यांची धर्मपत्नी सीता माता ही भूमी कन्या तसेच पार्वती माता ही हिमालय कन्या आहे. दोन्ही माता या पृथ्वी मातेचे आत्मस्वरूप असून अन्नदाता बळीराजा हा या वसुंधरेचे रक्षण करतो मात्र आता माती, पाणी, हवा, आकाश व प्रकाश ही पंचतत्वे दूषित झाल्याने त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांसह अखिल प्राणिमात्रास भोगावे लागत आहेत. त्यातून रानफुल या काव्य संग्रहाची निर्मिती झाली आहे. त्यासाठी प्रसिद्ध कवी चंद्रकांत पालवे, कैलास दौंड, महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे अध्यक्ष राजन लाखे, व्याकरणतज्ञ रंगनाथ सुंबे, डॉ. संजय पवार आदींचे अनमोल सहकार्य लाभले.

यावेळी डॉ. विकास ओझर्डेकर म्हणाले, आज भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी झाली असून सन २०३० मध्ये आपण कॅन्सर ची देखील राजधानी होऊ पहात आहे. त्यामुळे त्यासह विविध दुर्धर विकारांना प्रतिबंध करण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात मिलेट्सचा वापर करणे ही काळाची गरज आहे. 

 यावेळी कवी संमेलनात प्रा. अरुण सोनवणे यांनी प्रथम, योगाचार्य अशोक पाटील यांनी द्वितीय तर अशोक कुमावत यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांचा उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सन्मान पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उन्नती नाकील, नक्षत्रा भामरे, स्वप्नाली पवार यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्वच कवींना वर्ल्डकल्चर अँड एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन कमिशन, नवी दिल्लीच्या वतीने काव्यवाचन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्य संयोजक डॉ. संजय पवार यांच्या ' कुणब्याची गाथा ' या शेतकऱ्यांच्या  जीवनावर आधारित चरित्र ग्रंथास गीते बाबा मठ, पंढरपूर यांच्यातर्फे ट्रॉफी, प्रमाणपत्र, शाल पुष्प देवून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला तसेच विठ्ठल रहाणे यांच्या गणित गीतानंद या नवप्रकाशित ग्रंथाला देखील गीते बाबा मठ, पंढरपूर यांच्यामार्फत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी पद्मश्री नरहरी कडेकर यांनी पुणेरी पगडी घालून डॉ. संजय गीते यांचा सत्कार केला. यावेळी प्रा. डॉ. दत्तात्रय फलके तसेच प्रा. संगीता कढणे रहाणे यांनी काव्य परीक्षक म्हणून काम पाहिले.

डॉ. संदेश शहा यांनी अन्नदाता बळीराजा ही पहिलीच स्वलिखित उस्फुर्त कविता सादर करून सर्वांची मने जिंकली.

प्रास्ताविक भाषणात डॉ. संजय पवार यांनी डॉ. संजय गीते यांचे ऋणानुबंध स्पष्ट करून कार्यक्रमाचे शिस्तबद्ध, उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी रविंद्र सुमन मुकुंदराव माळुंजकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा