*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- पिंपरी बुद्रुक गावातील अनेक कुटुंबे दारूच्या व्यसनाधीनतेने बर्बाद झाली आहेत. त्यामुळे गावात संपूर्ण दारूबंदी, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोडीची शिक्षा, महिला व मुलींच्या संरक्षणासाठी कठोर कारवाई करण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत एकमुखाने संमत करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बबन बोडके होते. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना ठरावाचे निवेदन देण्यात येणार आहे.
पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी विठ्ठल रूक्मिणी मंदिरात विशेष ग्रामसभेचे ज्येष्ठ नागरिक बबन बोडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन केले होते. यावेळी माजी सरपंच श्रीकांत बोडके, आबासाहेब बोडके, पोलिस पाटील वर्धमान बोडके, संजय बोडके, राजेंद्र मगर, चांगदेव बोडके, सुदर्शन बोडके, सौदागर काटकर, युवराज बोडके, दत्तात्रय पतुले, भाऊ रणदिवे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश लंबाते, शंकर रणदिवे आदिंसह मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर ग्रामसभेत जेष्ठ नागरिक, तरूण पिढी बरोबरच मान्यवर मंडळी उपस्थित होती. ग्रामपंचायत अधिकारी गणेश लंबाते यांनी ग्रामसभे पुढील विषय वाचले त्यावर ग्रामसभेत वादळी चर्चा करण्यात आली. गावात चार अवैद्य दारूचे व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरू असून यामुळे अनेक कुटुंबांतील व्यक्ती व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याने कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. तर काहीचे कुटुंब कर्तेच गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे सदर व्यक्तींना बोलावून कडक समज देण्यात आली. यापुढे गावात दारूविक्री केल्यास प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल.
तसेच गावातील प्रमुख चौक, विद्यालय परीसर व सार्वजनिक ठिकाणी तरूण युवक हुल्लडबाजी, गाड्यांच्या पुंगळ्या काढून गाड्या फिरवणे, रस्त्यावर केक कापणे अशामुळे मुली व महिलांना फिरणे मुश्किल झाले आहे. यापुढे असे प्रकार दिसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास त्याची भरपाई तर द्यावीच लागेल व कायदेशीर कारवाईसही सामोर जावे लागेल. त्याचप्रमाणे चिकन व मच्छीचे खराब कचरा यांची विल्हेवाट ग्रामपंचायतने सांगीतलेल्या ठिकाणी करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल. तसेच महावितरणने सायंकाळी सहा ते दहा सुरू केलेले भारनिमयमनामुळे चोऱ्या व मोटर, केबल, स्टार्टर व इतर साहित्य चोरीचे प्रमाण वाढले आहे. एकतर त्याची वेळ बदलावी किंवा सिंगल फेज सुरू करावे.
सदर ग्रामसभेच्या निर्णयाचे इतिवृत्त निवेदन स्वरूपात जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस निरीक्षक इंदापूर, गटविकास अधिकारी इंदापूर व बावडा औट पोष्ट यांना देण्यात येणार आहे. यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा महिलांचा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चौकट - पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतने यापूर्वीच्या ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव करून प्रशासनाला दिले होते. परंतू प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम केल्याने दारु विक्री जोमात सुरू असल्याची कुजबुज उपस्थितांतून ऐकावयास मिळाली.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात ग्रामसभेला उपस्थित नागरिक.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा