*पुणे, डॉ. संदेश शहा*.
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो. ९९२२४१९१५९*
प्राचीन भारतीय श्रमण संस्कृतीचे प्रतीक असलेले तसेच जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा २६२५ वा जन्म कल्याणक महोत्सव आनंद दरबार, दत्तनगर, कात्रज पुणे चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात आला.
दत्तनगर येथील मनोज सुराणा यांच्या निवासस्थानापासून भगवान महावीर यांच्या प्रतिमेसह सवाद्य मिरवणुकीने भव्य शोभायात्रेस प्रारंभ झाला. यावेळी मिरवणुकीत अहिंसा परमो धर्म की जय, त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की, भगवान महावीर यांचा एकच संदेश, जगा आणि जगू द्या, जैन धर्म की जय असा जयघोष करण्यात आला. यावेळी श्रावक व श्राविका यांनी फुगडी तसेच गरबा खेळण्याचा आनंद लुटला. तर भक्तिगीतावर महिलांनी एकच ताल धरत नृत्य केले. या शोभायात्रेचा समारोप आनंद दरबार प्रांगणात करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक फलक, शोभायात्रेत आबालवृद्ध नागरिकांचा सहभाग तसेच भक्तीमय संगीत गाणी, भजन हे या मिरवणुकीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
आनंद दरबार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक संदीप बेलदरे, नगरसेविका स्मिता कोंढरे, नगरसेविका सीमा बेलदरे, नगरसेवक व्यंकोजी खोपडे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास चोरघे, दीपक बेलदरे, सूर्यकांत जेधे, शिवाजी काळोखे यांनी जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वच वक्त्यांनी मोबाईल च्या जमान्यात युवापिढीवर होत असलेल्या धार्मिक संस्काराबद्दल पालकांचे कौतुक केले.
यावेळी सुधीरबापू कोंढरे म्हणाले, भगवान महावीर यांनी पाच तत्वावर जैन धर्माचे तत्वज्ञान सर्वांसमोर पोहोचवले. त्यांनी अहिंसेला सर्वोच्च धर्म मानले. सर्व राजवैभव असताना देखील ते घरातून बाहेर पडून त्यांनी शाश्वत सुखाचा शोध घेतला. त्यांचे तत्वज्ञान आज देखील उपयुक्त आहे. आचार्य आनंदऋषी महाराज यांच्या चरण पादुका यांची स्थापना देशात सर्वप्रथम करून दत्तनगरचे नाव संपूर्ण देशात पोहोचवल्या बद्दल त्यांनी आनंद दरबाराचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांना मनपुर्वक धन्यवाद दिले.
यावेळी युवराज बेलदरे म्हणाले, संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जन्म कल्याणक मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध, आदर्श पद्धतीने, आनंद व्दिगुणित करणारी निघाली. त्याबद्दल मी बाळासाहेब धोका व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो.आनंद दरबाराचे उपक्रम स्तुत्य असून आम्ही सर्व उपस्थित मान्यवर आनंद दरबार च्या कार्यास सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहोत.
आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका म्हणाले, भगवान महावीर यांनी अखिल प्राणिमात्रासाठी मानवतेची शिकवण दिली. त्यांनी संपूर्ण विश्वास अहिंसा, सत्य, संयम, त्याग, शाकाहार, अपरिग्रह, अनेकांतवाद याचे महत्व पटवून दिले. त्यांचे विचार शांततामय सहजीवनासाठी आज देखील उपयुक्त आहेत. यावेळी त्यांनी जैन धर्माचा महामंत्र णमोकार मंत्र याचे महत्व सांगितले. आनंद दरबारच्या विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक तसेच भावी उपक्रमांची माहिती दिली.
भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मुख्य संयोजक डॉ. अंकिता धोका, डॉ. संदेश शहा, डॉ. भूषण गंगवाल, डॉ. करिश्मा मुत्था, डॉ. जय जाधव, डॉ. सिद्धार्थ सुखवाणी यांनी दंतोपचार तसेच होमिओपॅथिक तपासणी व औषधोपचार रुग्णसेवा केली तर व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिकस चे
महंतेश नाईक यांनी मोफत रक्तातील साखरेची तपासणी केली. यावेळी सोनाली गांधी जाधव यांनी शुद्ध पाण्याचे महत्व समजावून सांगितले.
कार्यक्रमादरम्यान युवापिढीने भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित गीते, भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सादरकर्त्या मुला मुलींचा सत्कार करण्यात आला. सहभागी झालेल्या सर्व मुलांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. योगिता, उदय आणि दुगड यांनी 'नवकारशी' महाप्रसाद साठी आपला सहयोग दिला. मनोज सुराणा यांनी आपली मदत पुरवली, तर राजमाता आनंदीबाई रतनचंदजी धोका यांनी 'गौतम प्रसादी' ( सामुदायिक भोजन) साठी विशेष योगदान दिले.
संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी व्यवस्थापन 'आनंद सहयोग ग्रुप'ने केले. संस्थेचे युवा अध्यक्ष अमित कोटेचा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यजमान संस्था आनंद दरबार आणि श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, दत्तनगर, पुणे चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी सर्व सहयोगदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दिलीप संचेती, सुभाष लुणावत, विलास कोटेचा, प्रमोद राका, प्रकाश भटेवरा, उदय दुगड , संतोष दुगड, सौरभ धोका, जवाहर धोका, सुयोग भंडारी, किरण शहा, दीपाली चुत्तर, सुजाता सुराणा आदी मान्यवर उपस्थित होते.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा