*इंदापूर, डॉ. संदेश शहा*
*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक* *मो. ९९२२४१९१५९*
इंदापूर शहर व परिसराच्या शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शेती, आरोग्य क्षेत्रात अनमोल योगदान देणारे श्री नारायणदास रामदास शहा हे उत्तुंग दूरदृष्टीचे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे असे प्रतिपादन इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त अंगद शहा यांनी केले.
इंदापूर येथील
शहा ग्लोबल स्कूल मध्ये स्व. श्री नारायणदास रामदास शहा यांच्या पुण्यतिथी निमित्त अत्यंत श्रद्धापूर्वक आणि भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षणाची जाणीव निर्माण करत त्यांच्या महान कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. श्री नारायणदास रामदास शहा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विश्वस्त अंगद शहा, श्रीमती रुचिरा शहा, सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अंगद शहा पुढे म्हणाले, श्री नारायणदास रामदास शहा या महान व्यक्तिमत्वाच्या कुटुंबात जन्म घेतल्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. समाजाच्या शाश्वत विकासासाठी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, मूल्याधारित शिक्षण देण्यासाठी शहा ग्लोबल स्कूल कटिबद्ध असून आपण त्यांच्या आदर्शांवर चालत राहिलो, तरच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
यावेळी सौ. अमृता चव्हाण म्हणाल्या, स्व. श्री नारायणदास रामदास शहा हे केवळ ऋषितुल्य, आदर्श व्यक्तिमत्व नव्हते, तर त्यांचे विचार दूरदृष्टीचे आणि प्रेरणादायी होते. त्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देखील सक्रिय सहभाग घेऊन देशासाठी आपले अनमोल योगदान दिले.
सन १९३८ मध्ये त्यांनी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात एक क्रांतिकारक पाऊल उचलले. त्या काळात शिक्षणाची साधने मर्यादित असताना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून अनेक जण डॉक्टर, अभियंते, शासकीय अधिकारी, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच त्यांनी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. इंदापूर परिसराच्या शाश्वत विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले, ज्याचा लाभ आज देखील समाजाला होत आहे.
ते भगवान पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते. त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरमध्ये आणून इंदापूरकरांना आध्यात्मिक पर्वणी दिली. त्यामुळे इंदापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विचारधारेत भर पडली. त्यामुळे वारकरी परंपरेला चालना मिळाली. स्व. शहा यांचा स्वभाव अत्यंत नम्र, संयमी आणि शांत होता. ते लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव तत्पर असत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात माणुसकी, सेवा आणि कर्तव्यनिष्ठा यांचा सुंदर संगम होता. त्यामुळेच ते सर्वांच्या आदराचे आदर्श केंद्रबिंदू बनले होते.
विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमातून प्रेरणा घेत, आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, परिश्रम आणि समाजसेवेचे मूल्य अंगीकारण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचा समारोप अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक वातावरणात झाला.या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची जाणीव झाली, त्यांना महान व्यक्तिमत्वांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा