*इंदापूर, डॉ. संदेश शहा*
*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक* *मो. ९९२२४१९१५९*
विद्या प्रतिष्ठान इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये भारत फोर्ज लिमिटेड, मुंढवा, पुणे या नामांकित कंपनी तर्फे कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये २१ विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये महाविद्यालयातील
विविध शाखांतील ७९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण ७९ विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या असून त्यापैकी २१ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. यामध्ये ई अँड टीसी व मेकॅनिकल शाखेतील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले. यामध्ये विद्या प्रतिष्ठान इंदापूर पॉलिटेक्निक महाविद्यालयातील एकूण ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या निवड प्रक्रियेसाठी कंपनीतर्फे मानव संसाधन विभागाचे उपव्यवस्थापक जितेंद्र झोपे व उत्पादन व्यवस्थापक पंकज घोलप उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानासोबतच संवादकौशल्य व व्यक्तिमत्व विकासा चीही देखील कसून चाचणी घेतली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक वेतनासह कॅन्टीन, मेस, युनिफॉर्म व वाहतूक सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी जितेंद्र झोपे म्हणाले, “आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक ज्ञानावर न थांबता सॉफ्ट स्किल्स, शिस्त आणि टीमवर्क यावर भर देणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्रात सातत्याने शिकत राहणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले, “विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. अशा कॅम्पस ड्राइव्हमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या उद्योगांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.”
महाविद्यालयाचे प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी प्रा. योगेश जाधव म्हणाले, “विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध करण्यासाठी आम्ही नियमितपणे प्रशिक्षण, मॉक इंटरव्ह्यू आणि व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम राबवतो. याच प्रयत्नांचे हे जोरदार यश आहे.”
विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ई अँड टीसी विभागातील ५ विद्यार्थी व मेकॅनिकल विभागातील ६ विद्यार्थी यांचा समावेश असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – तुषार सुहास पवार, ओंकार परमेश्वर कुंभार, मंगेश तानाजी काजळे, सिद्धांत राजेंद्र चव्हाण, शुभम विश्वनाथ चापकानाडे, आदित्य तानाजी मिसाळ, प्रणव बाळासाहेब वरगड, ओंकार दिलीप कदम, रेहान खालिद मोमीन, नजामअली कलीम काझी व सिद्धांत शाहाजी जाधव.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची संपूर्ण टीम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त, प्राचार्य व सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा