*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
दहिगाव येथील फोरबेची तळपातळी पाच मीटरने खोल केल्यास दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन उन्हाळ्यातही पुर्ण क्षमतेने दिले जाईल असे मत आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले व या मागणीसाठी आपला शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे ठामपणे सांगितले. सध्या करमाळा तालुक्यातील पुर्व भागात दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी दिले जात आहे. सध्याचे आवर्तन हे जवळपास तीन महिन्यांपासून सुरू असल्याने १०० व्या दिवस गाठण्याच्या स्थितीत आहे. या पार्श्वभूमीवर आपले मत व्यक्त करताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले कि दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनामध्ये उजनीची पाणी पातळी खालावली जात असल्याने काही समस्या प्रकर्षाने जाणवतात. यामुळेच आपण जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे १ जुलै २०२५ रोजी एका लेखी निवेदनाद्वारे दहिगाव येथील फोरबेची उंची ही ४९० मीटर ऐवजी ४८५ मीटर करावी अशी लेखी मागणी केली आहे. या मागणीसाठी आपण पाठपुरावा चालू ठेवला आहे. वास्तविक पाहता उजनी जलाशयाच्या पाणी पातळीशी संबंधित दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ४९० मीटर इतके बंधन शासनाने त्याकाळी घालून दिले आहे. यामुळे ४९० मीटर पर्यंत उंचीची एक भींत दहिगाव उपसाच्या पंप हाऊस एक येथील फोरबे मध्ये बांधली गेली आहे. या कारणास्तव उजनीची पाणी पातळी ४९० मीटर पर्यंत गेल्यास आपोआपच दहिगाव उपसासाठीचा पाणी उपसा बंद होतो. खरं तर हि योजना ज्यावेळी मंजुर केली जात होती त्याचवेळी फोरबेच्या उंची या मुद्द्यावर गंभीरतेने विचार केला गेला पाहिजे होता. जर त्याचवेळी ही उंची पाच मीटरने आणखी खाली नेली असती व फोरबेची तळपातळी ही ४८५ मीटरवर ठेवली असती तर पुर्व भागाला उन्हाळ्यात सुध्दा पुर्ण क्षमतेने पाणी देणे अगदी सहज शक्य झाले असते. परंतु आता आपण ही मागणी लावून धरली आहे. करमाळा तालुक्यातील तीसहून अधिक गावांनी उजनी जलाशयाच्या निर्मितीसाठी त्याग केला असुनही या करमाळा तालूक्यास उजनीचा म्हणावा तितका फायदा शासनाने मिळवुन दिला नाही. यामुळेच आता दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या फोरबेची तळपातळी ही ४९० मीटर वरुन ४८५ मीटर करणे ही पहिली मागणी असेल तर मी संकल्पित केलेल्या नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी उजनीतुन उपसा करण्यास मिळावा व हि योजना कार्यान्वित करण्यात यावी ही आपली दुसरी मागणी असणार आहे. या दोन्ही मागणीसाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा चालू ठेवला असुन या मागण्या पुर्ण झाल्यास करमाळा तालुक्यातील सिंचनक्षेत्रात नक्कीच वाढ होईल व शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल असा आशावाद आमदार नारायण आबा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सध्या सुरू असलेल्या आवर्तनाबाबत त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्या कामावर समाधान व्यक्त केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा