इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
मानसिक व शारीरिक तंदुरुस्त आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि कैवल्यधाम, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत योग शिबिराचा लाभ ५०० हून जास्त नागरिकांनी घेतला.
संस्थेच्या अध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य योग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून योगाभ्यासाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, इंदापुरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ५०० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर योगामय झाला होता.
हे विशेष योग शिबिर एकूण ५ सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे पहिले सत्र पहाटे ५.३० वाजता शहा सांस्कृतिक भवन येथे झाले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अल्फा बाईट कॉम्प्युटर्स येथे शिबिर संपन्न झाले. प्रामुख्याने 'मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य' या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या युगात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासोबतच मन शांत आणि संतुलित कसे ठेवावे, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.
शिबिराचे आयोजन करणाऱ्या दोन्ही संस्थांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा मोठा आहे. कैवल्यधाम ही संस्था योग प्रसार आणि संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असून, पारंपारिक योगाला विज्ञानाची जोड देण्याचे कार्य करते तर दुसरीकडे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण, तसेच ग्रामीण भागातील तरुण, तरुणी व महिलांना कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने उपक्रम राबवत आहे. या दोन्ही नामांकित संस्थांनी एकत्र येऊन आरोग्य जनजागृतीसाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरले आहे.
शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे कैवल्यधामचे अनुभवी योगशिक्षक योगेश वैद्य आणि आरती पवार यांचे मार्गदर्शन होते. त्यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. शरीर आणि मन यांचा समन्वय साधून उत्तम जीवनशैली कशी जगावी, यावर त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विशेष भर दिला. शिबिरातील शिस्त आणि प्रशिक्षणार्थींचा उत्साह यावेळी वाखाणण्याजोगा होता.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी ट्रस्टच्या विविध विभागांना भेटी देऊन संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी संस्थेत सुरू असलेल्या विविध व्यावसायिक कोर्सेसची सविस्तर माहिती जाणून घेतली. या प्रसंगी संस्थेचे खजिनदार तुषार रंजनकर, 'डिजिटेक इंडिया'चे अजित गटे आणि पतंजली योगचे शिक्षक दत्तात्रय अनपट, चंद्रकांत देवकर, प्रशांत गिड्डे व अशोक अनपट, संस्थेचे कार्यकर्ते महादेव चव्हाण, हमीदभाई अत्तार, भारत बोराटे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे इन्चार्ज दिपक जगताप, अमोल राऊत, सौ. त्रिशला पाटील, सौ. रोहिणी जाधव, केदार गोसावी, वेदांत घोरपडे, संग्राम यादव, कुमार गवळी यांनी परिश्रम घेतले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा