*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360
नागरिकांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन सदर तक्रार तातडीने मार्गी लावण्याचा धडाका करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत व उपनगराध्यक्ष अतुल फंड यांनी लावला आहे. प्रभाग ७ मधील अस्वच्छता आणि पाणीप्रश्नाबाबत नागरिकांनी दिलेल्या निवेदनानंतर, नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष पाहणी करून कसाब गल्ली ते कानाड गल्ली आणि शाहू नगर परिसरातील पाणी योजनेसाठी सुमारे २५ लाख रुपयांच्या कामांना पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
नगराध्यक्षा मोहिनी सावंत व उपनगराध्यक्ष अतुल फंड यांनी कामाचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेऊन प्रभाग ७ कसाब गल्ली ते कानाड गल्ली येथील जुनी पाईपलाईन बदलण्यासाठी ८,९९,३५२/- रुपयांच्या निधीला पालकमंत्र्यांच्या सहकार्याने मंजुरी घेतली आहे. यामुळे या भागातील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि गळतीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच शाहू नगर परिसरमध्ये शाहू नगर भाग १ मधील पाईपलाईनसाठी ९,९१,३७२/- रुपये तर शाहू नगर भाग २ मधील पाईपलाईन बदलण्यासाठी ६,०९,४०८/- अशा मोठ्या रकमेची प्रशासकीय मंजुरी मिळविली आहे. वरील मंजुरीसाठी नगरपरिषदेतील सर्व नगरसेवक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
सदर कामांच्या इ-निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रभाग ७ मधील नागरिकांनी नगरपालिकेत येऊन नगराध्यक्षांची भेट घेतली होती. निवेदनाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना स्वच्छतेचे व पाईपलाइन बदलण्याबाबत अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले होते. अवघ्या काही दिवसात निधीची तरतूद झाल्याने नगराध्यक्षांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना नागरिक म्हणाले की, आम्ही आमच्या समस्यांबाबत नगराध्यक्षांना फक्त एकदाच भेटलो होतो. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने प्रत्यक्ष पाहणी केली आणि आता निधीचीही तरतूद केली. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण इतक्या वेगाने झाल्यामुळे आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.
नगराध्यक्षांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे शहरातील रखडलेली कामे मार्गी लागत असल्याचे चित्र आता करमाळ्यात दिसत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा