*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
: इराण-इस्रायल युद्ध आणि वाढत्या खनिज तेलाच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना पेट्रोल-डिझेल आणि परकीय चलन वाचवण्यासाठी ‘काटकसर’ करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या भूमिकेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक शब्दांत समाचार घेतला आहे. “स्वतः शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढता आणि जनतेला काटकसरीचा सल्ला देता?” असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट लिहीत सरकारला आरसा दाखवला आहे.
पंतप्रधानांचा दुटप्पीपणा; राज ठाकरेंचे थेट वार
राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, पंतप्रधानांनी भारतीयांना सोने खरेदी कमी करणे, परदेश दौरे टाळणे आणि पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, हे आवाहन करताना स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी देशभरात शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. “स्वतःवर फुलं उधळून घेताना पेट्रोल-डिझेल वाया जात नाही का? जनतेला उपदेश करण्यापूर्वी आपण स्वतः हे दौरे थांबवणार का?” असा खडा सवाल त्यांनी केला आहे.
आंतरराष्ट्रीय किमतींचे गणित आणि ‘रेवडी’ संस्कृती
खनिज तेलाचे भाव सध्या ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल आहेत. राज ठाकरेंनी आठवण करून दिली की, यापूर्वी मनमोहन सिंग यांच्या काळात आणि स्वतः मोदींच्या काळातही हे भाव इतकेच होते, पण तेव्हा असे आवाहन केले गेले नव्हते.
जेव्हा कच्चे तेल ६०-६५ डॉलर्सवर होते, तेव्हा सरकारने जनतेकडून जो लाखो कोटींचा कर वसूल केला, तो पैसा कुठे गेला? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. पंतप्रधानांनी ज्या ‘रेवडी संस्कृती’ची (मोफत योजना) निंदा केली होती, त्याच योजना राबवून निवडणुका जिंकल्या जात आहेत. महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आल्याचा दावाही त्यांनी केला.
शिक्षण आणि परकीय गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह
लोकांनी परदेशात जाऊ नये या आवाहनावर राज ठाकरे म्हणाले की, भारतात गेल्या १०-११ वर्षांत दर्जेदार शिक्षणात मूलभूत गुंतवणूक झालीच नाही. केवळ ‘हिंदी’ लादण्यावर लक्ष दिले जात आहे. तसेच, गेल्या तीन महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी रुपये भारतीय बाजारातून काढून घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
लालबहाद्दूर शास्त्रीजींच्या कार्यपध्दतीचा संर्दभ
लालबहाद्दूर शास्त्रीजींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस असंच आवाहन केलं होतं पण त्यात त्यांनी स्वतः ते कृतीत उतरवलं होतं. अशी कृती स्वतः पंतप्रधान करतील का आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून करून घेतील का ? हे केलंत तर देश पण करेल. असा सुचक सल्लाही त्यांनी दिला.
तज्ज्ञांचे ऐका, संसदेचे अधिवेशन बोलवा
राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना सल्ला दिला की, “तुमची ‘मन की बात’ खूप झाली, आता खऱ्या अर्थतज्ज्ञांचे ऐका.” रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर्सनी राजीनामे का दिले आणि रुपयाचे अवमूल्यन का झाले, याचे उत्तर जनतेला द्यावे. तसेच, या आर्थिक संकटावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी त्यांनी केली. शेवटी, “स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरू करा, मगच जनतेला आवाहन करा,” असा टोलाही त्यांनी लगावला.
दौरे थांबवा, मग सल्ले द्या!
राज ठाकरे यांनी शेवटी पंतप्रधानांच्या आगामी ५ देशांच्या दौऱ्यावर निशाणा साधला. “पंतप्रधान स्वतः १५ मे पासून परदेश दौऱ्यावर जात आहेत. आधी तुम्ही हे दौरे थांबवा आणि मग जनतेला काटकसरीचे आवाहन करा,” असा टोला त्यांनी लगावला आहे. राज ठाकरेंच्या या विखारी टीकेमुळे राजकीय वर्तुळात आता मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा