Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ मे, २०२६

उजनीत परदेशी 'हेलिकॉप्टर' माशांचा सुळसुळाट! फिश टँकमधून जलाशयात पोचले; जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोकादायक!

 *अकलूज -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*




केत्तूर : दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी परिसरातील सकरमाउथ अर्थात 'हेलिकॉप्टर' मासा आता उजनी धरणासह भीमा नदीलगतच्या जलस्रोतांमध्ये वेगाने वाढू लागला आहे. तो स्थानिक मत्स्यसंपदा आणि पर्यावरणासाठी मोठे संकट बनला आहे. फिश टँकमधून जलाशयात सोडण्यात आलेल्या या परदेशी प्रजातीने आता उजनीत बाळसे धरले आहे.

सकर माशांची प्रजनन क्षमता मोठी असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशी व कार्प जातींच्या माशांना धोका निर्माण करण्याबरोबरच हे मासे मच्छीमारांच्या जाळ्यांचेही मोठे नुकसान करतात. जाळ्यात अडकल्यानंतर त्यांच्या तीक्ष्ण दातांमुळे जाळी फाटते, अशी माहिती प्राणिशास्त्र प्रा. डॉ. अरविंद कुंभार यांनी दिली.

जलाशयांच्या मजबुतीला धोका

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएचएनएस) अभ्यासानुसार, हे मासे नदी व तलावांच्या काठांमध्ये बिळ तयार करतात. त्यामुळे

धरणे, बंधारे आणि तलावांच्या मजबुतीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे मासे खाण्यायोग्य नसल्याने त्यांची विक्री होत नाही. मात्र, फिश ऑइल आणि खत निर्मितीसाठी त्यांचा वापर केला जात असल्याची माहिती बीएचएनएसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे यांनी दिली.

आतापर्यंत १३ टन संकलन

'वेटलँड इको-रेस्टोरेशन अँड फिशरीज डेव्हलपमेंट प्रोग्राम'अंतर्गत १४ एप्रिलपासून सुरू झालेल्या मोहिमेत आतापर्यंत १३ टनांहून अधिक सकर मासे संकलित करण्यात आले आहेत. १०० किलोपेक्षा जास्त मासे पकडणाऱ्या मच्छीमारांना विशेष बक्षिसे आणि प्रमाणपत्रेही दिली जात असल्याचे डॉ. काटवटे यांनी सांगितले.

छंदातून संकट जन्माला...

बीएचएनएसचे संचालक किशोर रिठे म्हणाले, लोक छंद म्हणून फिश टँकमध्ये सकर मासे पाळतात. नंतर कंटाळा आल्यावर ते जलाशयात सोडले जातात. एकदा हे मासे नैसर्गिक जलस्रोतांत स्थिरावले की त्यांना नियंत्रित करणे कठीण होते.

उजनीत आता सर्रास सापडतात 'सकरमाउथ'

पूर्वी क्वचित दिसणारे सकर मासे आता उजनीत मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. एक किलोपर्यंतचे मासे जाळ्यात अडकतात आणि जाळ्यांचे नुकसान करतात, असे मच्छीमार सोमनाथ कनिचे यांनी सांगितले. पक्षी निरीक्षक कल्याणराव साळुंके यांनीही उजनी जलाशयात वाढणाऱ्या सकर आणि मांगुर माशांमुळे जैवविविधतेसमोर धोका निर्माण झाल्याचे सांगत त्यांचा नायनाट करण्याची गरज व्यक्त केली.

सकर हटाव मोहिमेला वेग

सकर माशांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन बीएचएनएसने विशेष मोहीम सुरू केली आहे. भिगवण मासळी बाजारात येणारे सकर मासे १५ ते २० रुपये किलो दराने खरेदी केले जात असून, मच्छीमारांना अतिरिक्त दोन रुपये प्रोत्साहन भत्ताही दिला जात आहे. भारतातील हा पहिलाच प्रयोग मानला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा