Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ८ मे, २०२६

संघर्षच माणसाला खऱ्या यशापर्यंत पोहोचवतो: गणेश करे-पाटील सरपडोह जिल्हा परिषद शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात; माजी विद्यार्थी मेळावा व शालेय स्टेजचे लोकार्पण

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



"माणसाच्या आयुष्यातील संघर्ष हा त्याला थांबवण्यासाठी नसून, त्याला यशाची खरी चव चाखण्यासाठी तयार करत असतो. जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर घेतलेले शिक्षणच प्रगतीचा मार्ग प्रशस्त करते," असे प्रतिपादन यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष *प्रा. डॉ. गणेश करे-पाटील* यांनी केले.

करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरपडोह येथे १ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'माजी विद्यार्थी मेळावा' व 'सांस्कृतिक महोत्सवात' ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सोलापूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी *मनोज राऊत*यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने आणि दीपप्रज्वलनाने सोहळ्याचा प्रारंभ झाला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेचे पहिले विद्यार्थी वसंत बंडू रंदवे (वय ८१ वर्षे) आणि पहिल्या विद्यार्थिनी सुमन जयवंतराव घोगरे-निंबाळकर (वय ७७ वर्षे) यांची उपस्थिती. या ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करून शाळेने आपल्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला उजाळा दिला. यावेळी सरपंच मालनताई पांडुरंग वाळके उपस्थित होत्या.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नूतन शालेय स्टेजचे उद्घाटन करण्यात आले. हे सुसज्ज स्टेज उभारण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांचे आर्थिक योगदान दिल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण मारुती खराडे व प्रगतशील बागायतदार अशोक जयवंतराव घोगरे यांचा विशेष गौरव करण्यात आला. शिक्षणाची ओढ पाहून मनोज राऊत यांनी विद्यार्थी अभ्यासिकेसाठी मदतीचा हात दिला, तर गणेश करे-पाटील यांनी ११ हजार रुपयांची आणि राज्य विक्रीकर अधिकारी सुधीर अडसूळ यांनी ५ हजार रुपयांची पुस्तके अभ्यासिकेला भेट देण्याचे जाहीर केले.

सातारा सैनिक स्कूलमध्ये निवड झाल्याबद्दल यशराज अरुण चौगुले या विद्यार्थ्याचा तसेच विविध स्पर्धांत यश मिळवणाऱ्या साक्षी खराडे, शिवानी भंडारे, समृद्धी गवारे, समीक्षा मोटे व विशंभू पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात अंगणवाडीच्या चिमुकल्यांपासून ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य आणि नाटकांमधून उपस्थितांची मने जिंकली. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कलेवर खुश होऊन ४०,४१५ रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव केला.

*लोकसहभागातून १.३५ लाखांचा निधी*

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या भौतिक विकासासाठी माजी विद्यार्थी व ग्रामस्थांकडून एकूण १ लाख ३५ हजार ४१५ रुपयांचा निधी संकलित झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तात्रय खराडे, उपाध्यक्ष बाळासाहेब भिताडे, खजिनदार शरद घोगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब महाडीक, नितीन येळे, अरुण चौगुले सर, सर्पनाथ सेवा मंडळ (पुणे ग्रुप) आणि सर्व शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीकृष्ण अडसूळ यांनी केले, सूत्रसंचालन दादासाहेब माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच नाथाराव रंदवे यांनी मानले. या मेळाव्याला सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा