Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ८ मे, २०२६

*सराफ व्यावसायिकावरील अन्यायाच्या विरोधात करमाळा सराफ सुवर्णकार संघटनेचे गृहमंत्र्याना निवेदन* *मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


तपासाच्या नावाखाली सराफ व्यावसायिकाला ताब्यात घेऊन मारहाण करून त्याच्याकडील सोने अनाधिकाराने आटवून याबाबत दाद मागणारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर बडतर्फेची कार्यवाही व्हावी, यासाठी शुक्रवारी करमाळा तालुका सराफ सुवर्णकार व संलग्न कारागीर व्यावसायिक संघटनेच्या वतीने गृहमंत्र्यांच्या नावे करमाळा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील सराफ व्यावसायिकाला कोतवाली पोलिस स्टेशनचे पीएसआय गणेश देशमुख व त्यांच्या डीबी पथकाने बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन अपहरण, अमानुष मारहाण, बेकायदेशीर रिकव्हरी आणि खंडणी उकळली आहे. चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी या व्यावसायिकाच्या दुकानातील कायदेशीर सोने दागिने जबरदस्तीने आटवून त्याची लगड तयार करण्यास भाग पाडले. याशिवाय या व्यावसायिकाच्या मदतीला गेलेल्या उमेश बुऱ्हाडे व इतरांनाही मारहाण करण्यात आली आहे.

त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या पीएसआय गणेश देशमुख आणि त्याच्या पथकातील सर्व दोषी कर्मचाऱ्यांना केवळ निलंबित न करता कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे, संबंधित अधिकाऱ्यांवर खंडणी, अपहरण, गंभीर दुखापत करणे आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे आणि जी. आर. मधील मार्गदर्शक तत्त्वांचे थेट उल्लंघन केल्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये तात्काळ गुन्हे दाखल करावेत. तसेच दोषी पोलीस अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे जमा केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होऊन ती मालमत्ता जप्त करण्यात यावी, सराफ व्यावसायिकाकडून बेकायदेशीररीत्या हस्तगत केलेला ऐवज ससन्मान विनाविलंब तात्काळ परत मिळावा आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थानिक पोलिसांऐवजी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) किवा विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करावी,अशा मागण्या या निवेदनाद्वारे संघटनेने केल्या आहेत.

या प्रकरणातील दोषीवर विनाविलंब तात्काळ कडक कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातील सराफ सुवर्णकार व संलग्न कारागीर, व्यावसायिक बांधव राज्यभर सराफा बाजारपेठा बंद ठेऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही या निवेदनाद्वारे संघटनेने दिला आहे.

हे निवेदन देतेवेळी करमाळा तालुका सराफ सुवर्णकार व संलग्न कारागीर व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत वाशिंबेकर, उपाध्यक्ष रवी सोनी, सचिव राधेश्याम देवी यांच्यासह दत्तात्रय काटकर, अमित ढाळे, मुस्तफा मलिक, अभिजीत दोशी, सुधांशू घोडके, शेखर वाशिंबेकर, ओंकार वाशिंबेकर, मनोहर बुऱ्हाडे, बिपिन मरोठी, अमित सोळंकी आदीजण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा