Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ मे, २०२६

देश विकासात जैन धर्माचे योगदान महत्त्वपूर्ण, मात्र धर्माच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी अल्पसंख्याक दर्जा टिकवणे ही काळाची गरज : मिलिंद फडे

 *पुणे, डॉ. संदेश शहा.सहसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो. ९९२२४१९१५९*


जैन धर्म हा प्राचीन श्रमण संस्कृतीचे प्रतीक असून देश विकासात जैन धर्म पहिल्यापासून अनमोल योगदान देत आहे. प्राचीन वेदांमध्ये देखील जैन तीर्थंकर यांचा आदराने उल्लेख असून देशाच्या विविध प्रांतात जैन धर्मीयांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. मात्र सध्या जैन संस्कृतीवर होत असलेले हल्ले चिंताजनक आहे. या   परिस्थितीत जैन धर्माला मिळालेला अल्पसंख्याक दर्जा जर काढून घेतला, तर भविष्यात जैन धर्माच्या स्वतंत्र अस्तित्वाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे परखड मत ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद फडे यांनी व्यक्त केले.


पुणे येथील 'अरिहंत जागृती मंच' च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद फडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकांत कोठारी होते. अरिहंत जागृती मंचाने ‘जैन धर्माच्या अस्तित्वाला धोका- कारणे व उपाय’ हा अतिशय संवेदनशील, समयोचीत आणि समकालीन विषय निबंध स्पर्धेसाठी निवडला होता. या स्पर्धत राज्यभरातून एकूण १८५ स्पर्धक सहभागी झाले होते.  

स्पर्धेचे परीक्षण डॉ. कमलकुमार जैन आणि डॉ. श्रद्धा लुणावत यांनी केले.


मिलिंद फडे पुढे म्हणाले, निबंध लेखन ही एक साधना आणि कला आहे. जो व्यक्ती सखोल विचार करू शकतो, तोच प्रभावी पणे आपले विचार कागदावर उतरवू शकतो. जैन धर्म हा केवळ कर्मकांडावर आधारित नसून तो कर्माच्या सिद्धांतावर चालतो. केवळ पूजा अर्चा केल्याने फळ मिळते असे हा धर्म मानत नाही तर माणसाला त्याच्या कर्माप्रमाणेच फळ प्राप्त होते, हा जैन धर्माचा मूळ सिद्धांत आहे.

परीक्षक डॉ. श्रद्धा  लुणावत म्हणाल्या, एखाद्या दिव्याने जसे अनेक दिवे लावले जातात तसेच या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून समाजात जागरूकतेची ज्योत पेटली आहे. सर्वच निबंध दर्जेदार असल्यामुळे विजेते निवडणे हे परीक्षकां साठी मोठे आव्हान होते. मात्र या स्पर्धेतून मोठे विचारमंथन झाले आहे.

परीक्षक डॉ. कमलकुमार जैन म्हणाले, जैन धर्म हा अनादीअनंत असून भगवान ऋषभदेव हे  पहिले तर भगवान महावीर हे अंतिम तीर्थंकर आहेत. काहींच्या मते हा धर्म केवळ २६०० वर्षांपूर्वीचा आहे, परंतु हे तथ्य पूर्णतः चुकीचे आहे. आपण आपली संस्कृती टिकवण्या साठी मुलांवर संस्कार करणाऱ्या पाठशाळा सुरू करणे आणि प्राकृत भाषेचा अभ्यास करणे अनिवार्य आहे.

 प्रास्ताविक भाषणात मंचाचे अध्यक्ष राजेंद्र सुराणा यांनी मंचाच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर निबंध स्पर्धा समन्वयक श्रीपाल ललवाणी यांनी या जैन धर्माच्या अस्तित्वा बाबत समाजात जागृती व्हावी, या हेतूनेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

कार्यक्रम यशस्वीते साठी जवाहर गुमते, संजय चोरडिया, शांतीलाल नवलाखा, नितीन शहा, संतोष  भन्साळी, ईश्वर भुरट, अमित जोगी यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी अचल जैन, आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका, दिलीप चेरबेले, विठ्ठल  साठे आदी मान्यवर उपस्थित होते. विजय  पारख यांनी विजेत्यांची नावे घोषित केली तर अजय ललवाणी यांनी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले.  प्रदीप फिरोदिया यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी विविध श्रेणीतील गुणवंत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.  **निबंध स्पर्धा २०२६ पारितोषिक विजेते पुढील प्रमाणे**

**प्रथम क्रमांक :** स्नेहल संजय छाजेड – पुणे

**द्वितीय क्रमांक :** सौ. उषा नितीनकुमार शेटीया – अहिल्यानगर

**तृतीय क्रमांक :** सौ. संध्या प्रकाश खडके – पुणे, सौ. सविता कटारिया – पुणे

**प्रोत्साहनार्थ :**

 * सौ. पायल स्वप्निल माळोदे – अमरावती

 * सौ. मोनिका अमित दोशी – कुर्डूवाडी

 * सौ. नेहा निशिकांत जंतूरकर – देऊळगाव राजा

 * सुनीलकुमार संपतराजजी जैन – पुणे

 * प्राचार्य सचिनकुमार जैन – बासवाडा

**युवा प्रोत्साहनार्थ :**

 * सौ. सेजल ऋषभ छाजेड – जामखेड

 * प्रांजल भाऊसाहेब मुनोत – पुणे

 * संयोगिता संतोष रोटे – कोल्हापूर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा