Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ जून, २०२६

मधुमेह व इतर आजारासाठी औषध म्हणून वापरात असलेल्या जांभूळ या फळ पिकाच्या जांभूळ सोन्याने पळसदेव येथील शेतकरी उत्तम बनसुडे यांना केले मालामाल, त्यांच्या घरी आली लक्ष्मी.


इंदापूर, डॉ. संदेश शहा.

दिनांक २२ जून २०२६

टाईम्स 45 न्यूज मराठी

सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९


उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पळसदेव या पुनर्वसित गावातील  शिंदेवस्ती येथील उत्तम राघु बनसुडे यांनी घेतलेल्या जांभूळ या फळपिकामुळे त्यांना मालामाल केले आहे. त्यांच्या घरी जांभूळ लक्ष्मी आली आहे.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बहुसंख्य शेतकरी ऊस या नगदी पिकास प्राधान्य देत होते. मात्र ऊसाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने तसेच इतर संकटामुळे अनेक शेतकरी इतर पिकाकडे वळले आहेत. त्यामध्ये प्राधान्याने केली, पेरू, डाळिंब आदी पिकांचा समावेश आहे. मात्र पाटबंधारे विभागात दफ्तर कारकून म्ह्णून सुमारे ३८ वर्ष  भिगवण, लोणी देवकर, पळसदेव, यवत इत्यादी ठिकाणी  शासकीय सेवा केलेल्या पळसदेव ( ता. इंदापूर, जि. पुणे ) येथील उत्तम बनसुडे यांनी सेवा निवृत्ती नंतर पत्नी संगीता बनसुडे व मुलगा सुहास बनसुडे यांच्या मदतीने शेती व्यवसायाला सुरुवात केली. आस्मानी आणि सुलतानी संकटाचे सावट असलेल्या शेती व्यवसायामध्ये त्यांनी फळबाग शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतात दीड एकर पेरू व एक एकर शेतीत कोकण बहाडोली जातीच्या जांभूळ पिकाची सहा वर्षांपूर्वी लागवड केली. सध्या दोन वर्षापासून जांभळाचे उत्पन्न सुरु झाले आहे. हे उत्पन्न किमान ३० ते ४० दिवस दररोज सुरु राहते. या जांभळ्या सोन्याने मात्र बनसुडे कुटुंबाला लखपती बनविले आहे.


उत्तम बनसुडे म्हणाले, दररोज साधारणतः ३०० ते ४०० किलो उत्पादन होत असून सर्व माल विक्रीसाठी मुंबई मार्केटला जात आहे. तिथे ए ग्रेड ला १०० ते १५० रुपये, बी ग्रेड ला ६० ते ८० व सी ग्रेड जांभळा ला ३० ते ४० रुपयांचा भाव मिळत आहे. या वर्षी साधारणतः एक एकर जांभूळ पिकातून ७ ते ८ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मागणी प्रमाणे पॅकिंग साठी बॉक्स उपलब्ध होत नसल्याने थेट कॅरेट मध्ये १० किलो प्रमाणे वजन करून मार्केटला  माल विक्रीसाठी पाठवला जातो. आकर्षक बॉक्स पॅकिंग केल्यास आणखी चांगला दर मिळू शकतो. इतर फळ पिकाच्या तुलनेत या पिकाला कमी खर्च येत असला तरी वर्षाला सुमारे २ ते ३ लाख रुपये उत्पन्न खर्च होत आहे. यामध्ये शेणखत व रासायनिक खत, औषधे, मजुरी, पाणी याचा खर्च होतो. उजनी धरण उशाला असले तरी वेळ प्रसंगी विकत पाणी घेऊन झाडे जगवावी लागल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मात्र सध्या माल तोडणीला आल्यावर तोडणीसाठी मजुराचा देखील खर्च मोठा आहे, अनेकदा तोडणीसाठी वेळेवर मजूर उपलब्ध होत नाही. मात्र मालाची तोडणी वेळेवरच करावी लागते अन्यथा नुकसान होते. तसेच अकस्मात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होण्याचा  धोका अधिक असतो.  अधिक दाट लागवड केल्यास देखील पेंग धारणा होत नाही. त्यामुळे ८ मी बाय ८ मी वर लागवड करणे योग्य असल्याचा सल्ला यानिमित्त श्री. बनसुडे यांनी दिला. वर्षातून एकदाच उत्पन्न मिळत असले तरी इतर फळबागेच्या तुलनेने कमी लागवड व कमी मेहनतीचं फळपीक असल्याने जांभूळ पिकाची लागवड केली. लागवडीनंतर सुरवातीस ४ वर्ष उत्पन्न येण्यासाठी लागतात. शिवाय यामध्ये जांभूळ पिकाचा वाण निवड देखील महत्वाची आहे .  महाराष्ट्रातील कोकण भागात प्रसिद्ध असलेली कोकण बहाडोली जांभळाची स्थानिक वाण ( फाळ ) मानली जाते. या वाणाची फळे मोठी, चवदार आणि बाजारात चांगल्या किमतीला विकली जातात. त्यामुळे या वाणाची लागवड केली आहे. ही फळे आकाराने मोठी व लांबट असतात. रंग गडद जांभळा ते काळपट असतो. गर जास्त आणि बी तुलनेने लहान असते. चव गोडसर व कमी तुरट असते. फळे रसाळ असल्यामुळे ग्राहकांची मागणी चांगली असते.


कोकणातील दमट व उष्ण हवामान या वाणासाठी अनुकूल आहे. मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन योग्य ठरते. जमिनीचा सामू म्हणजे पी एच साधारण ६.५ ते ७.५ असावा लागतो.

कलमाची रोपे लावणे अधिक फायदेशीर ठरते. पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जुलै मध्ये लागवड ८ मीटर बाय ८ मीटर वर करणे फायद्याचे ठरते. एक

 एकरमध्ये साधारण पणे ६० ते ६५ झाडे बसतात. एक मीटर × एक मीटर × एक मीटर आकाराचे खड्डे घेऊन प्रत्येक खड्ड्यात २० ते २५ किलो शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १०० ग्रॅम कीडनाशक भुकटी शिफारशीनुसार वापरणे गरजेचे आहे. पहिल्या दोन तीन वर्षांत नियमित पाणी द्यावे.  ठिबक सिंचन केल्यास पाण्याची बचत होते.  प्रौढ झाडांना उन्हाळ्यात आवश्यकते नुसार पाणी देणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारत हा मधुमेहाची जागतिक राजधानी असून आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये मधुमेह तसेच इतर चयापचयाच्या आजारामध्ये याचा औषध म्हणून सातत्याने वापर होतो. त्यामुळे याला वर्षभर मागणी असते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठ, घाऊक फळ व्यापारी आणि किरकोळ विक्रीमध्ये या फळास चांगली मागणी असते. प्रक्रिया उद्योगासाठी म्हणजे जॅम, स्क्वॅश, सिरप, व्हिनेगर यासाठी देखील वापर होतो.

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या रोपवाटिका, शासनमान्य खाजगी रोपवाटिका, कोकणा तील स्थानिक जांभूळ उत्पादकांकडून याची रोपे मिळतात. कुठलेही नैसर्गिक संकट आले नाही तर जांभूळ फळ पिकामुळे चांगली समृद्धी येते हा माझा खात्रीशीर अनुभव आहे. त्यामुळे नवीन फळबाग लागवड करण्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांनी या पिकाची निवड करण्यास प्राधान्य द्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा