*इंदापूर, डॉ. संदेश शहा*
दि. १९ जून २६,
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन, फादर्स डे आणि जागतिक संगीत दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आरोग्य, संस्कार, कृतज्ञता आणि कला यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा संयुक्त कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरवात श्रीमती मेघना पाटील यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवर, मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत करताना योगाचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक शांतता आणि भावनिक संतुलन राखण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी योग प्रशिक्षक दत्तात्रय अनपट आणि आदिनाथ दळवी हे योग शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैष्णवी देशपांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगत विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांची प्रात्यक्षिके सादर केली.
यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने योगसत्रात सहभाग घेतला. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन तसेच विविध श्वसनक्रियांचे प्रात्यक्षिक सादरीकरण करून त्यांनी त्यांचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासा मुळे शरीर सुदृढ राहते, मन एकाग्र होते, आत्मविश्वास वाढतो आणि तणाव कमी होतो, असे अनमोल मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा निर्माण झाली.
यानंतर फादर्स डे निमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांप्रती असलेले प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध सर्जनशील उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांनी आकर्षक हस्तनिर्मित शुभेच्छापत्रे तयार करून आपल्या भावना व्यक्त केल्या तर काही विद्यार्थ्यांनी वडिलांविषयी मनोगते व्यक्त केली. काहींनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी आणि प्रेरणादायी अनुभव सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कुटुंबातील नातेसंबंधांचे महत्त्व समजण्यास मदत झाली.
जागतिक संगीत दिनानिमित्त शाळेतील संगीतप्रेमी विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्या बडे मॅडम यांनी सुरेल आणि भावपूर्ण गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या मधुर गायनामुळे संपूर्ण परिसर संगीताच्या सुरांनी भारावून गेला. संगीत हे मनःशांती, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा देणारे प्रभावी माध्यम असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही संगीताच्या माध्यमातून कला आणि संस्कृती जपण्याचे महत्त्व जाणून घेतले.
आरोग्यदायी जीवन शैली, कुटुंबीयांविषयी कृतज्ञता, कलाप्रेम आणि सामाजिक मूल्यांची जपणूक यांचा संदेश देणारा हा संयुक्त उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि संस्मरणीय ठरला.
शहा ग्लोबल स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. या कार्यक्रमातूनही विद्यार्थ्यांमध्ये निरोगी सवयी, कौटुंबिक मूल्ये आणि कलाप्रेम विकसित करण्याचा प्रयत्न यशस्वीरीत्या साध्य झाल्याचे शेवटी स्कूल चे विश्वस्त अंगद शहा यांनी सांगितले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा