Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ११ जून, २०२६

वनगळी ता. इंदापूर येथे जलसंपदा विभागाचा दणका, शासकीय जमिनीवरील अनधिकृत काम बंद.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



उजनी धरण पाणलोट क्षेत्रात वनगळी ( ता. इंदापूर ) येथे उजनी धरण प्रकल्पासाठी संपादित शासकीय जमिनीवर परवानगी शिवाय सुरू असलेले मत्स्यतळे उभारणीचे काम जलसंपदा विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून थांबविले. जलसंपदा विभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवरील संभाव्य संकट टळले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


वनगळी परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाकडे लेखी तक्रार देत, शासनाच्या संपादित क्षेत्रात अनधिकृत खोदकाम सुरू असल्याची माहिती दिली होती. या कामामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी टाकलेल्या पाईपलाईनना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या तक्रारीची गंभीर दखल घेत जलसंपदा विभागाचे मोजणीदार एन. आर. मनाळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

यावेळी घटनास्थळी जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनाळे यांनी संबंधित व्यक्तीस शासनाच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येणार नसल्याची सूचना देत काम तत्काळ बंद करण्यास भाग पाडले तसेच यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सिंचना साठी करण्यात आलेल्या पाईपलाईन सुरू ठेवण्याबाबत आश्वस्त केले.



यावेळी श्री मनाळे म्हणाले, "संपादित क्षेत्र शासनाच्या मालकीचे असून कोणत्याही व्यक्तीस मनमानी करण्याचा अधिकार नाही. भविष्यात असा प्रकार आढळल्यास विभागाकडे तात्काळ तक्रार करावी, त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल.

या थेट कारवाईमुळे संभाव्य वाद टळला असून शासनाच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताचे देखील रक्षण झाले आहे. स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांकडून जलसंपदा विभागाच्या तत्पर भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.

फोटो  : वनगळी येथे उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात सुरू असलेले अनधिकृत खोदकाम थांबविताना जलसंपदा विभागाचे मोजणीदार एन. आर. मनाळे व उपस्थित शेतकरी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा