इंदापूर, डॉ. संदेश शहा.
दिनांक २० जून २०२६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयचे राष्ट्रीय पुस्तकालय मिशन अंतर्गत सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी क्षमता विकास कार्यक्रमाचे दिनांक २१ ते २५ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रामार्फत कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून राज्यातील विविध सार्वजनिक ग्रंथालयांतील ग्रंथपाल व कर्मचारी यामध्ये सहभागी होणार आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमात ग्रंथालय व्यवस्थापन, डिजिटल ग्रंथालय सेवा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, वाचन संस्कृती संवर्धन, ज्ञान संसाधनांचे व्यवस्थापन तसेच आधुनिक ग्रंथालयीन सेवांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सार्वजनिक ग्रंथालयांची कार्यक्षमता वाढविणे आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ज्ञानस्रोत केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश विजय बर्वे यांनी सांगितले की, राष्ट्रीय पुस्तकालय मिशनच्या उद्दिष्टांनुसार ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून आधुनिक तंत्रज्ञान आधारित ग्रंथालय व्यवस्थापनाची माहिती सहभागींपर्यंत पोहोचविण्यात येईल.
या कार्यशाळेसाठी राष्ट्रीय पुस्तकालय मिशनचे अतिरिक्त मिशन निर्देशक व भारत सरकारचे संस्कृती मंत्रालयाचे उपसचिव राजेंद्रसिंह बोरा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय पुस्तकालय मिशनचे अधिकारी दिपांजन चटर्जी आणि संदीप दास हे देखील उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले, “ज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीसाठी ग्रंथालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी आधुनिक ज्ञान, कौशल्ये आणि डिजिटल साधनांचा प्रभावी वापर आत्मसात करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पुस्तकालय मिशन अंतर्गत आयोजित हा क्षमता विकास कार्यक्रम सार्वजनिक ग्रंथालयांच्या बळकटी करणासाठी आणि ज्ञानसेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरेल. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाचे आयोजन करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असून सहभागी कर्मचाऱ्यांना याचा निश्चितच लाभ होईल.”
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानस्रोत केंद्रातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असून राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय व्यवस्थेच्या गुणवत्तावाढीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
जनसंपर्क कक्ष यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा