Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ११ जुलै, २०२६

*कंत्राटी सहकाऱ्याच्या कुटुंबासाठी शिक्षण विभागाचा माणुसकीचा हात; पाच लाख रुपयांचा मदतनिधी सुपूर्द*

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


सोलापूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले कै. सौदागर गोविंदराव वाघमारे यांचे दि. १६ मे २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

कै. वाघमारे यांनी कंत्राटी सेवेत कार्यरत असतानाही अत्यंत प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने काम केले. मर्यादित मानधनात काटकसरीने संसार सांभाळत त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर बनविले. मात्र, कंत्राटी सेवेमुळे त्यांच्या निधनानंतर शासनाकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ उपलब्ध नसल्याने त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या.

ही बाब लक्षात घेऊन मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर येथील श्री मल्हारी माने, प्रशासन अधिकारी यांनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील शिक्षकांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सुमारे पाच लाख रुपयांचा मदतनिधी संकलित करण्यात आला.

या निधी संकलन मोहिमेत समग्र शिक्षा अभियानातील सर्व विशेष विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक तसेच सौ. अश्विनी लांबतुरे, केंद्रीय मुख्याध्यापक यांचे विशेष सहकार्य लाभले.

संकलित मदतनिधी डॉ. सचिन ओंबासे, आयुक्त, सोलापूर महानगरपालिका व नियंत्रण अधिकारी शिक्षण विभाग तथा मुख्य लेखाधिकारी डॉ रत्नराज जवळगेकर यांच्या हस्ते कै. सौदागर वाघमारे यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

यावेळी बोलताना आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, "संकटसमयी सहकाऱ्याच्या कुटुंबासाठी अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांनी दाखविलेली संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकी अनुकरणीय आहे. हा उपक्रम माणुसकी, सहकार्य आणि परस्पर विश्वास जपणारा असून समाजासाठी प्रेरणादायी आहे."

याप्रसंगी डॉ. रत्नराज जवळगेकर (मुख्य लेखाधिकारी), श्री मल्हारी माने (प्रशासन अधिकारी), श्री मनीष बांगर, सौ. रजनी राऊळ, श्री सुरेश कासार, सौ. निलोफर सय्यद, सर्व पर्यवेक्षक, तसेच समग्र शिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री रियाज अत्तार, समन्वयक (समावेशित शिक्षण) श्री अविनाश शिंदे, श्री अमोल गायकवाड, श्री ज्ञानेश्वर गरड, सौ. सुवर्णा गुरव, श्री लक्ष्मण पुजारी, श्री गुरुप्रसाद तलवार आदी उपस्थित होते.

कै. सौदागर वाघमारे यांच्या कुटुंबासाठी उभारण्यात आलेला हा मदतनिधी केवळ आर्थिक सहाय्य नसून शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांच्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा