उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
कै. रामचंद्र चांगदेव चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चव्हाण परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ५०० आंब्याच्या रोपांचे मोफत वाटप हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि त्यांच्या विचारांचा जिवंत वारसा जपणारा आदर्श उपक्रम ठरला.
कै. रामचंद्र चव्हाण हे मोहिते-पाटील परिवाराच्या पूर्व भागातील एक निष्ठावान, विश्वासू आणि जनसामान्यांच्या सुख-दुःखात कायम सहभागी होणारे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी राजकारण, सहकार आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. ते मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही कार्यरत होते. प्रगतशील बागायतदार म्हणून त्यांनी आधुनिक शेतीचा आदर्श निर्माण केला आणि अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित हरिनाम कीर्तनाने आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. कीर्तनातून समाजप्रबोधन, संस्कार आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर ५०० आंब्याच्या रोपांचे वाटप करून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश पंचक्रोशीतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
आजच्या वाढत्या प्रदूषणाच्या आणि हवामान बदलाच्या काळात प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमातून "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश कृतीतून समाजासमोर ठेवण्यात आला. आंब्याचे झाड हे केवळ फळझाड नसून पुढील अनेक वर्षे पर्यावरण, अर्थकारण आणि पुढील पिढ्यांसाठी संपत्ती निर्माण करणारे वृक्ष आहे.
*चव्हाण परिवाराने प्रथम पुण्यस्मरण केवळ औपचारिक न ठेवता समाजोपयोगी कार्याशी जोडून एक आदर्श निर्माण केला आहे. अशा उपक्रमांमुळे दिवंगत व्यक्तींच्या कार्याची आठवण जिवंत राहते आणि समाजालाही सकारात्मक दिशा मिळते.*







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा