Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ जुलै, २०२६

भेसळखोरांविरोधातील कारवाई सुरूच;* *नियम पाळणाऱ्यांनी घाबरू नये: तुकाराम मुंढे*

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ करणाऱ्यांविरोधातील कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. नियमांचे प्रामाणिकपणे पालन करणाऱ्या व्यावसायिकांनी घाबरण्याची गरज नसून नागरिकांना सुरक्षित, भेसळमुक्त अन्न आणि गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.


पुण्यात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंढे यांनी अन्नभेसळ, प्रतिबंधित गुटखा विक्री, दुधजन्य पदार्थांची गुणवत्ता आणि औषधांच्या बेकायदा विक्रीबाबत प्रशासनाची भूमिका मांडली. अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या सर्व आस्थापनांनी स्वच्छता व गुणवत्ताविषयक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ही कारवाई कोणालाही त्रास देण्यासाठी नसून नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आहे. आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रशासनाकडून दूध संकलन केंद्रांपासून प्रक्रिया उद्योग, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांपर्यंत संपूर्ण पुरवठा साखळीची तपासणी केली जात आहे. पनीर, खवा, लोणी, तूप, चीज आणि आइस्क्रीम यांसारख्या दुधजन्य पदार्थांच्या गुणवत्तेवरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर शाळांमधील कॅन्टीन, उपहारगृहे आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे.

पुणे विभागात राबविण्यात आलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा संशयित व नियमबाह्य अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहात स्वच्छता, अन्नसाठवणूक आणि तापमान नियंत्रणातील त्रुटी आढळल्यानंतर त्याचा परवाना निलंबित करण्यात आला होता.

प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक व विक्रीविरोधातील कारवाईही कायम राहणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करत नागरिकांचा सहभाग आणि व्यावसायिकांचे नियमपालन यामुळेच 'सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र' हे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा