Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ जुलै, २०२६

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रिंगण मैदानाची मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कडून पाहणी, पालखी स्वागतासाठी इंदापूर सज्ज : नगराध्यक्ष भरत शहा.

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*

*सहसंपादक- टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो. ९९२२४१९१५९*


श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील आबालवृद्ध भाविकांचे आकर्षण असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या  सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय प्रांगणातील रिंगण मैदानाची पाहणी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नगराध्यक्ष भरत शहा, नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, प्राचार्य संजयकुमार शिंगारे व सहकाऱ्यांनी केली. यावेळी हरित वारी निमित्त मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूर येथील पालखी सोहळ्यातील आकर्षक रिंगण सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो वारकरी येतात. त्यामुळे हा रिंगण सोहळा शिस्तबद्ध होणे गरजेचे आहे.

इंदापूर शहर व पंचक्रोशीस आध्यात्मिक पर्वणी ठरणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखीचे इंदापूर नगरपरिषद हद्दीत येत्या शनिवारी आगमन होणार असून पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती नगराध्यक्ष भरत शहा व मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली.


इंदापूर शहरात पालखीचा मुक्काम औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील पालखी तळ या ठिकाणी असून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता नगरपरिषद युद्धपातळीवर काम करत आहे. संपूर्ण पालखी मार्गावरील रस्त्यांचे खड्डे भरणे, रिंगण तयारी करणे, पालखी तळ सुशोभीकरण करणे, रस्त्यांची स्वच्छता, धूर फवारणी, सार्वजनिक शौचालय दुरूस्ती व स्वच्छता आदी कामे करण्यात येत आहेत. शहरातील सर्व पथदिवे सुस्थितीत सुरु राहतील तसेच स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. शहरातील पालखी दरम्यान पाणी भरणा केंद्र असणाऱ्या विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

शहरातील सर्व उपहारगृहांची पाहणी करून त्यांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. पालखी मुक्कामाचे ठिकाण असलेले औद्योगिक प्रशिक्षण संस्था,इंदापूर येथे मंडप, स्टेज, विद्युत, शौचालय, स्नानगृह व निवारा आदी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपरिषदेचे एकूण १०४ अधिकारी, कर्मचारी वारकऱ्यांच्या  व्यवस्थेसाठी व सेवेसाठी काम करत आहे. त्यासाठी प्रत्येक कामासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

शहरात २० ठिकाणी निर्मल वारी अंतर्गत शौचालयाची सुविधा

शहरात नगरपरिषद कार्यालय शाळे शेजारी, माळवाडी रोड,अंबिका मंदिर परिसर,नामदेव मंदिर परिसर,इरिगेशन कॉलनी,अकलूज ब्रीज जवळ व ब्रीज पलिकडे,मार्केट यार्ड पश्चिम बाजू,मार्केट यार्ड बाहेरील बाजू, पालखी तळ पूर्व बाजू, आरकिले दवाखाना  जवळ, पालखी तळ पश्चिम बाजू,पालखी तळ चिंच प्रक्रिया केंद्रासमोर,

सरस्वतीनगर आय टी आय,नारायणदास हायस्कूल आतील बाजू,पोलिस स्टेशन समोर, राधाकृष्ण अपार्टमेंट, रयत शाळा, दूध डेअरी, शंभर फुटी रोड, ज्योतिबा रोड अशा एकूण २० विविध ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार आहेत. शहरातील नगरपरिषदेच्या एकूण १३ ठिकाणी सार्वजनिक शौचालय वारकऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

वारकऱ्यांकरिता ६ ठिकाणी दिंड्यांना टँकरने पाणी भरण्याकरिता मंगेश पाटील विहीर,बाबुराव भोंग विहीर, मुकुंद  शहा बोअरवेल, उंबरे बोअरवेल, मोहन शिंदे विहीर, अरुण भोंग विहीर या ठिकाणी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पालखी तळ येथे वारकरी स्त्री, पुरुष यांना वेगवेगळी स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी भरणा केंद्रामधून एकूण १० टँकर द्वारे वारकऱ्यांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. नगरपरिषदे मार्फत पालखी तळ येथे आपत्कालीन नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत ठेवण्यात आला आहे.

हरित वारी-सुरक्षित वारी' उपक्रमा करिता नगरपरिषद कार्यरत असून पालखी कालावधीत विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पालखी मार्गावर कचरा पडू नये यासाठी पेट्या ठेवण्यात येणार आहेत. प्लास्टिक मुक्त, तंबाखुमुक्त शहर ठेवण्यासाठी व पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष  भरत शहा, मुख्याधिकारी रमेश ढगे, उपनगराध्यक्ष  बाळासाहेब ढवळे, सभापती सागर अरगडे, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा