Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० जुलै, २०२६

जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीच्या खळाळत्या पाण्याने शाही स्नान, त्यानंतर महापूजा व समाज आरती, पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम संपवून पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे लाखो वैष्णवांच्या साक्षीने मार्गस्थ, पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाने पालखी सोहळ्यास भक्तीमय वातावरणात निरोप

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


:----- जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीच्या खळाळत्या पाण्याने शाही स्नान भक्तीमय वातावरणात घालण्यात आले. त्यानंतर महापूजा व समाज आरती करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम संपवून पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे लाखो वैष्णवांच्या साक्षीने मार्गस्थ झाली. पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाने पालखी सोहळ्यास भक्तीमय वातावरणात निरोप दिला. तर सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर प्रशासनाच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले.



    जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी च्या सराटी मुक्कामी पहाटे चार वाजता काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने पादुकांच्या चार पूजा संपन्न झाल्या. सकाळी सात वाजता सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे महाराज, लक्ष्मण मोरे, उमेश मोरे, अध्यक्ष जालिंदर मोरे, विश्वस्थ गणेश मोरे, वैभव मोरे, दिलीप मोरे यांनी परंपरेप्रमाणे पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने शाही स्नान घातले. त्यानंतर नदीतच हजारोंच्या संख्येने जमलेल्या वैष्णवांच्या साक्षीने महापूजा व समाज आरती करण्यात आली. यावेळी गुलाबाच्या पाकळ्यांनी व नदीच्या पाण्याने वारकरी, भक्तगण न्हावून निघाले.


      भक्तांच्या व वारकऱ्यांच्या दर्शनासाठी पादुका सराटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ठेवण्यात आले होते. यावेळी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार,  प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, भटे साहेब, तहसीलदार जिवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, पोलिस निरीक्षक विलास नाळे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, सरपंच अनिशा तांबोळी, उपसरपंच संतोष कोकाटे आदींनी दर्शन घेऊन पादुकांना पुणे जिल्ह्यातून सन्मानपूर्वक निरोप दिला. पालखी सोहळा प्रमुखांच्या वतीने प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचा फेटा, शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला



     पालखी सोहळा सकाळी आठ वाजता पुणे जिल्ह्यातून नीरा नदीवरील पुलावरून लाखो वैष्णावांच्या व भक्तांच्या साथीने ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकारामच्या जयघोषात सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ झाला. सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर जिल्हाधिकारी कार्तीकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी सुनील पाटील आदींनी फुलांची उधळण करत स्वागत केले. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात रिंगण सोहळा पार पडला.


चौकट : संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीच्या खळाळत्या पाण्याने स्नान घातले. पालखीने पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करूनही पाऊसाने हुलाकावणी दिली. यावर्षी पावसामुळे पालखीतील वारकऱ्यांची संख्या कमी प्रमाणात असूनही शिस्तीचे ज्वलंत उदाहरण बघावयास मिळाले. तर पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. पालखी सोहळ्याला निरोप दिल्यानंतर बंदोबस्तातील पोलीस कर्मचारी होमगार्ड महिलांना रडू कोसळले.

फोटो  - सराटी ( ता इंदापूर ) येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पादुकांना विधीवत नीरा नदीच्या पाण्याने शाही स्नान घालण्यात आले. समाजआरती व महापुजा करण्यात आली. 

...............................................................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा