*नातेपुते प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
: पुणे जिल्ह्यातील वीर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने बुधवारी (ता. ८) सायंकाळी ६ वाजल्यापासून नीरा नदीपात्रात एकूण ६,०३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात आणि पाणलोट भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील काळातील पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी आवक लक्षात घेऊन विसर्गामध्ये वाढ अथवा घट होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धरणाच्या सांडव्यावरून ४,६३७ क्युसेक तर एस्केपमधून १,४०० क्युसेक असा एकूण ६,०३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नीरा उजवा कालवा विभाग, फलटणचे कार्यकारी अभियंता यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करताना सांगितले की, पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक (येवा) पाहून हा विसर्ग आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो. त्यामुळे नीरा नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीपात्रात किंवा नदीकाठावरील शेतीसाहित्य, मोटारी, पाळीव जनावरे अथवा अन्य वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या तसेच सखल भागातील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सतर्क करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
___________________________
: नीरा नदीच्या खोऱ्यातील
धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. ८ तारखेला सायंकाळी ४ वाजेपर्यंत चार धरणांमध्ये नव्याने २.५७५ टीएमसी पाण्याची भर पडली असून, एकूण पाणीसाठा २६.८८९ टीएमसी झाला आहे. म्हणजेच धरणे ५५.६३ टक्के भरली आहेत. मात्र, मागील वर्षी याच दिवशी धरणांमध्ये ३४.०८७ टीएमसी, म्हणजेच ७०.५३ टक्के पाणीसाठा होता
धरणनिहाय पाणीसाठा पुढीलप्रमाणे
भाटघर धरण: १२ मिलिमीटर
पावसाची नोंद झाली असून, आजअखेर ४४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात १०.३६८ टीएमसी पाणीसाठा असून धरण ४४.१२ टक्के भरले आहे.
नीरा देवधर : २२ मिलिमीटर
पावसाची नोंद झाली असून, आजअखेर ८३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
धरणात ६.२२६ टीएमसी पाणीसाठा असून धरण ५३.०८ टक्के भरले आहे.
वीर धरण : ६ मिलिमीटर पावसाची
नोंद झाली असून, आजअखेर २४६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात ८.३३९ टीएमसी पाणीसाठा असून धरण ८८.६४ टक्के भरले आहे.
गुंजवणी धरण: ७० मिलिमीटर
पावसाची नोंद झाली असून, आजअखेर ९०९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात १.९५५ टीएमसी पाणीसाठा असून धरण ५२.९८ टक्के भरले आहे.
चार तालुक्यांचे आर्थिक गणित
नीरा खोऱ्यातील चार धरणांवर पश्चिम महाराष्ट्रातील फलटण, बारामती, माळशिरस, इंदापूर, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा