Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १८ जुलै, २०२६

इंदापूरात लक्ष लक्ष नेत्रांनी अनुभवला संत तुकोबा महाराज यांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

शनिवार, १८ जुलै २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९



नाम तुकोबाचे घेता डोले पताका डौलात।

 अश्व धावती रिंगणी नाचे विठु काळजात ।

पुंडलिक वरदा हरि विठ्ठल च्या नामघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात, आकाशात फडफडणार्‍या पताका आणि संत तुकाराम महाराज यांच्या जयघोषात लक्ष लक्ष नेत्रांनी अनुभवला आध्यात्मिक ऊर्जा देणारा रिंगण सोहळा. डोळ्यांचे पारणे फेडणारा अभुतपुर्व उत्साहाचा जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरा गोल रिंगण सोहळा इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर शनिवारी १८ जुलै रोजी दुपारी बारा वाजता संपन्न झाला. 



हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी व त्याची आठवण मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी लाखो वारकरी भक्तांचा जनसागर रिंगण ठिकाणी उसळला होता. रयत शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर गोल रिंगण आणि त्यात दिंड्यानी प्रवेश करण्यासाठीचा मार्ग अगोदरच आखणी केलेला होता. तुकाराम महाराज पालखी सोहळा बरोबर ११:४५ वाजता रिंगण मैदानात  आली. पालखीने रिंगण मैदानाला प्रदक्षिणा घालुन मध्यभागी चौथर्‍यावर विराजमान करण्यात आली. तेथे काही अंतरावर अश्व धावण्यासाठी रिंगण आखले होते. मधल्या जागेत दिंड्या आणि रिंगणाबाहेर वारकरी व भाविक थांबले होते.


सरूवातीला रिंगणात पताकावाले धावले. त्यानंतर डोक्यावर हंडा व तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी धावल्या. त्यानंतर विणेकरी, मृदुंगवादक व टाळकरी एका पाठोपाठ एक याप्रमाणे धावले. शेवटी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी देखील धावत पालखीला प्रदक्षिणा घालत  रिंगणातील फेरी पुर्ण केली. त्यानंतर बाभुळगावकरांचा मानाचा अश्व व मोहिते पाटलांचा स्वाराच्या अश्वाची पुजा ही महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या सुविद्य पत्नी सारिका भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, विजय जगताप यांचे हस्ते करण्यात आली. त्यानंतर रिंगण मैदानाला मान्यवरां सोबत अश्वांनी एक प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा पुर्ण झाल्यानंतर दोन्ही अश्व क्षणार्धात गोल रिंगण पुर्ण करण्यासाठी धावले. डोळ्याचे  पाते लवते न लवते तोच दोन्ही अश्वांनी वार्‍याच्या वेगाशी स्पर्धा करून पहिली वेगवान दौड पुर्ण केली,  क्षणार्धातच रिंगण फेर्‍या पुर्ण केल्या आणि पुंडलिक वरदा हरि विठ्ठलचा जयघोष आसमंतात दुमदुमला.



लक्ष लक्ष डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा संपन्न झाला. अश्व धावत असताना त्याच्या पायाच्या टापाखालच्या मातीचा टिळा वारकर्‍यांनी भक्तिभावाने कपाळी लावून दर्शन घेतले. पालखी सोहळ्यात एकूण ४०० दिंड्या असून त्यातील २७ दिंड्या रथापुढे तर २९८ दिंड्या रथाच्या मागे असून तात्पुरते नंबर दिलेल्या ७५ दिंड्या पालखी रथाच्या मागे आहेत.

फोटो : इंदापूर येथील रयत शक्षण संस्थेच्या मैदानात डोळ्याचे पारणे फेडणारा गोल रिंगण सोहळा ( फोटो जीवन फोटो स्टुडिओ, इंदापूर.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा