*उपसंपादक नुरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
लेखिका : नूरजहाँ शेख
संस्थापक-अध्यक्ष व मुख्याध्यापिका, फिनिक्स इंग्लिश स्कूल,लवंग
आजची मुले ही उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. त्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे पुरेसे नाही, तर त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी, शिस्त, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे तितकेच आवश्यक आहे. कारण बालपणी रुजलेले संस्कारच आयुष्यभर व्यक्तिमत्त्वाला दिशा देतात.
आजच्या डिजिटल युगात मुलांचा मोबाईल, दूरदर्शन आणि सामाजिक माध्यमांशी वाढता संपर्क ही चिंतेची बाब आहे. माहितीचे जग त्यांच्या हातात आले असले, तरी योग्य-अयोग्य यातील फरक समजावून सांगण्याची जबाबदारी पालक आणि शिक्षकांची आहे. मुलांना स्क्रीनपेक्षा पुस्तकांची, मैदानी खेळांची, सर्जनशील उपक्रमांची आणि निसर्गाची ओढ लावणे ही काळाची गरज आहे.
मुलांना वेळेचे महत्त्व, स्वच्छतेची सवय, नियमित अभ्यास, वाचन, मोठ्यांचा आदर, प्रामाणिकपणा, सहकार्य, कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धन यांसारखी जीवनमूल्ये कृतीतून शिकवली पाहिजेत. मुलांना वारंवार उपदेश करण्यापेक्षा मोठ्यांनी स्वतःच्या वर्तनातून आदर्श निर्माण केला, तर त्याचा अधिक प्रभाव पडतो.
शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संस्कारांची प्रयोगशाळा आहे. त्याचप्रमाणे घर हे मुलांचे पहिले विद्यालय आहे. जेव्हा घरातील संस्कार आणि शाळेतील मूल्यशिक्षण यांचा सुंदर संगम होतो, तेव्हा समाजाला सुसंस्कृत, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक मिळतात.
चांगल्या सवयी कोणत्याही महागड्या वस्तू विकत घेऊन मिळत नाहीत; त्या प्रेम, संयम, सातत्य आणि आदर्श कृतीतून घडतात. आज मुलांच्या मनात चांगुलपणाची बीजे पेरली, तर उद्या त्याच बीजांचे विशाल वटवृक्ष समाजाला सावली देतील.
"मुलांना संपत्तीपेक्षा संस्कार द्या; कारण संस्कारच त्यांची खरी आयुष्यभराची संपत्ती असते."





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा