*उपसंपादक नुरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
लेखिका : नूरजहाँ शेख
संस्थापक-अध्यक्ष व मुख्याध्यापिका,
फिनिक्स इंग्लिश स्कूल ,लवंग २५/४
आजच्या काळात पालक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण, आधुनिक सुविधा आणि यशस्वी आयुष्य देण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र या सर्वांसोबत एक महत्त्वाचा जीवनसंस्कार देणे अनेकदा राहून जाते—अपमान, टीका आणि नकार पचवण्याची ताकद.
आजची मुले कौतुकाला सरावलेली आहेत; पण टीका झाली, अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही किंवा कोणी कठोर शब्द बोलले, तर ती मानसिकदृष्ट्या खचून जातात. काही मुले रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतात, तर काही आत्मविश्वास गमावतात. डिप्रेशन मध्ये ही जातात , ही परिस्थिती चिंताजनक आहे.
जीवन म्हणजे केवळ यश, पुरस्कार आणि टाळ्यांचा प्रवास नाही. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी अपयश, नकार, टीका आणि अपमानाचा सामना करावाच लागतो. हे टाळता येत नाही; मात्र त्याला कसे सामोरे जायचे, हे शिकवता येते. म्हणूनच मुलांना प्रत्येक वेळी जिंकण्यापेक्षा पराभवानंतर पुन्हा उभे राहण्याचे शिक्षण देणे अधिक आवश्यक आहे.
अपमान सहन करणे म्हणजे अन्याय स्वीकारणे नव्हे. स्वाभिमान जपत, योग्य मार्गाने आपली भूमिका मांडणे आणि चुकीविरुद्ध ठामपणे उभे राहणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु प्रत्येक टीकेला रागाने उत्तर देण्याऐवजी संयमाने विचार करणे आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची वृत्ती अंगीकारणे, हेच खरे व्यक्तिमत्त्व घडवते.
घर आणि शाळा या दोन्ही ठिकाणी मुलांना भावनिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची गरज आहे. त्यांना अडचणींपासून कायम दूर ठेवण्यापेक्षा त्या अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याची तयारी करून दिली पाहिजे. कारण संकटांपासून पळणारी मुले नव्हे, तर संकटांना सामोरे जाणारी मुलेच उद्याचे सक्षम नागरिक बनतात.पोहायला शिकण्यासाठी ज्याचे त्यानेच हात पाय हलवावे लागतात .ज्ञानी होण्यासाठी ज्याचा त्यानेच अभ्यास करावा लागतो कष्ट घ्यावे लागतात.
आपण मुलांना संपत्ती, शिक्षण आणि यशाची स्वप्ने देतो; त्याचबरोबर संयम, सहनशीलता, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची शिदोरीही दिली, तर ते कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहतील.
कारण जीवनात कायम टाळ्या मिळत नाहीत; पण अपमानातूनही उभे राहण्याची ताकद ज्याच्यात असते, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा