"*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामार्फत मौजे अकलूज, माळेवाडी,संग्रामनगर व शंकरनगर येथील नागरिकांना टँकरमार्फत आर.ओ.पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. यावेळी त्यांनी सयाजीराजे मोहिते-पाटील मित्रमंडळ परिवार, अकलूज यांनी जनतेची सेवा हेच कर्तव्य मानून पाणी वाहतूक तसेच वितरण करणेसाठी स्वयंसेवक म्हणून मोठा सहभाग नोंदविला असल्याचे आवर्जुन सांगितले
सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्यांना पुर येवून पुरस्थिती निर्माण झालेली आहे तर काही भागात अद्याप पाऊस झाला नसल्याने व कमी प्रमाणात पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होवून शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.कारखाना कार्यक्षेत्रामधील मौजे अकलूज, माळेवाडी,संग्रामनगर व शंकरनगर या गावातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत असलेल्या मौजे विझोरी येथील तलावात पाणी साठा उपलब्ध नाही तसेच पाटबंधारे विभागाकडून इरिगेशनचे येणारे पाणी वेळेत न मिळाल्याने पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे.सदर भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याकरिता सामाजिक बांधीलकीचा एक भाग म्हणून कारखान्यामार्फत मोफत आर.ओ.प्रक्रिया केलेल्या शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकरव्दारे सुरु केला आहे.
पावसाची अनिश्चितता व पाटबंधारे विभागाकडून पाणी उपलब्धता याचा विचार करता सर्व नागरिकांनी टॅंकरव्दारे मिळणारे पाणी शिस्तीने घेवून काटकसरीने वापरावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले.यापूर्वी कारखान्याने सन १९७२ व २०१६ च्या दुष्काळात सोलापूर जिल्ह्यासह इंदापूर तालुक्याला टँकरव्दारे पिण्याचे पाण्याचा पुरवठा केला होता तसेच सन २०११-२०१२ मध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील तीव्र दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी साठवणूकी करीता मोफत सिंटेक्स टाक्यांचे वाटप केले होते.त्याचबरोबर कोरोना-१९ कालावधीत जिवणावश्यक साहित्याचे वाटप, अर्सेनिक अल्बम सारखी औषधे अकरा हजार कुटूंबियांना पुरवठा केलेला आहे. सन २०१९ मध्ये सांगली जिल्ह्यातील मौजे चोपडेवाडी या पूरग्रस्त गावातील ३५० कुटूबांना जिवणावश्यक वस्तूचे वाटप केले आहे.सध्या अतिशय पाणी टंचाईच्या काळात कारखान्याव्दारे पाणी पुरवठा सुरू केल्याने या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची सोय झालेली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा