*अकलूज-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
पंढरपूर : जनतेचा विरोध डावलून कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हा महामार्ग लादला, तर येत्या काळात या सरकारचा 'शक्तिपात' झाल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह उपस्थित नेत्यांनी दिला.
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्रात तीव्र असंतोष पसरला आहे. पंढरपुरात सर्वपक्षीय नेते आणि शेतकऱ्यांनी शक्तिपीठ बाधितांची सद्बुद्धी दिंडी काढण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. येथील इसबावी ते श्री विठ्ठल मंदिरासमोरील संत नामदेव पायरीपर्यंत भर पावसात पायी दिंडी काढत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी महायुती सरकारला विठ्ठलाने द्यावी, असे साकडेही घालण्यात आले.
शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती'च्या वतीने पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'सद्बुद्धी दिंडी'ला वारकरी आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देण्यात येत होत्या. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही आंदोलकांचा उत्साह कमी झाला नाही. इसबावी ते थेट संत नामदेव पायरीपर्यंत हजारो शेतकरी आणि वारकऱ्यांनी पायी चालत दिंडी काढली
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार अमित देशमुख, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आ. कैलास पाटील, आ. अभिजित पाटील, कॉ. गिरीश फोंडे आदी सहभागी झाले होते. या वेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, विधिमंडळात प्रश्न उपस्थित करूनही सरकार या महामार्गाबाबत स्पष्ट बोलत नाही. मात्र, पाठीमागून शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्याचीच पुनरावृत्ती इथे करण्याचा सरकारचा डाव आहे. हा जनआंदोलनाचा पूर आता थांबणार नाही, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
तर हा महामार्ग भाविकांसाठी नसून, गडचिरोलीतील खाणींमधून गोव्याला खनिज पोहोचवण्यासाठी बनवला जात आहे. भाविकांना या रस्त्यावरून जाताना प्रति किलोमीटर १० रुपये टोल मोजावा लागणार आहे. आमच्या जमिनी बळकावून जर विकासाचे मनोरे रचणार असाल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी आपल्या मनोगतामध्ये सरकार विरोधी भूमिका मांडली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा