*करमाळा तालुका -प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो;-9850686360*
नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी आता आमदार नारायण आबा पाटील यांनी अधिक गतीने पाठपुरावा सुरू केला असून मंत्रालयात याबाबत बैठक घेण्याच्या त्यांच्या मागणीस यश आले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनित खास नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी बैठक पार पडली. या बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच आमदार नारायण आबा पाटील व जलसंपदा विभागाचे महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाची चर्चा झाली असता आमदार नारायण आबा पाटील यांनी नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी नियमक मंडळाच्या बैठकीत या विषयास मंजुरी देण्यात आली आहे परंतु या कामाचा चतुर्थ सुप्रमा मध्ये समावेश केलेला असल्याचे सांगून ही बाब नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी अधिक काळ वाट पहायला लावणारी असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षण कामाचा तृतीय सुप्रमात समावेश करुन तातडीने या कामास पन्नास लाख रुपये मंजुर करण्यात यावे अशी मागणी केली. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन अधिकाऱ्यांना या बाबीची पडताळणी ठरण्याचे आदेश दिले आहेत तसेच सर्वेक्षणासाठी निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे आता नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील उत्तर भागातील सुमारे पासष्ट हजार एकर क्षेत्र या योजनेमुळे ओलिताखाली येणार असल्याचे सांगुन शेतकऱ्यांना आर्थिक विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी हा अतिशय महत्वाचा प्रश्न असल्याचे सांगितले. या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की रिटेवाडी उपसा सिंचन योजना हा माझा संकल्प असल्याने या कामाचा पाठपुरावा मी अविरतपणे चालू ठेवला आहे. आता या बैठकीत निधीची तरतूद करण्यात आली असल्याने खऱ्या अर्थाने या कामास प्रत्यक्षात सुरुवात होईल.येत्या काही महिन्यात या कामाचे सर्वेक्षण करुन घेण्यास आपण प्राधान्य दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा