Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १२ जुलै, २०२६

अतिथी देवो भव या तत्वाने पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करून पुण्य संपादन करावे : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

रविवार, १२ जुलै २६ 

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



इंदापूर तालुक्यातून पाच मोठे पालखी सोहळ्यासह इतर पालखी सोहळे जातात. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे स्वागत तसेच त्यांचे आदरातिथ्य योग्य करून वारकरी सेवा ही ईश्वरसेवा मानून सर्वांनी पुण्य संपादन करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर प्रशासकीय भवन सभागृहात  पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक मंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, नगराध्यक्ष भरत शहा, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.



 दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, पालखी विश्वस्तांनी पालखी मार्गाची पाहणी करताना इंदापूरबद्दल चांगले मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आपले कागदोपत्री नियोजन चांगले झाले असले तरी पालखी सोहळ्यात त्याची अंमलबजावणी चोख होणे गरजेचे आहे. या कामात कुचराई व हलगर्जीपना

करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.


 यंदापासून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी किमान दोन लाख रुपये देण्यात येणार आहे तसेच नीरा नदीत  पालखी व पादुकांना स्नान घातले जाते त्या  सराटी गावाला दहा लाख रुपये दिले  जाणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेवटी दिली.

प्रांताधिकारी उत्तम दिघे म्हणाले, इंदापूर तालुक्यातून पाच मानाच्या पालख्या जातात. राज्यात सर्वाधिक १६ मुक्कामांचा तालुका म्हणून इंदापूर प्रसिद्ध असून पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ग्रामसेवक, तलाठी व ग्रामपंचायतींसोबत आढावा बैठका घेऊन सर्व तयारी पूर्ण केली आहे. यंदा प्रत्येक मुक्कामस्थळी दोन जर्मन टेन्ट, स्नानगृहे व अग्निशामक दलाची व्यवस्था करण्यात आली आहे. निमगाव केतकी येथील पिण्याच्या पाण्याचा व सराटी येथील स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. वारकरी व दिंडींसाठी गॅस वितरणाचे नियोजन करण्यात येत आहे. सर्व मुक्कामस्थळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

तहसीलदार जीवन बनसोडे म्हणाले,  जिल्हा प्रशासनाने जानेवारी पासून पालखी सोहळ्याचे नियोजन सुरू केले असून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस व इतर विभागांनी पालखी मार्ग, ग्रामीण रस्ते, पाणी, निवारा व आरोग्य सुविधा यांचा आढावा घेतला आहे. वारकऱ्यांसाठी औषधे, प्राथमिक उपचार, आयसीयू सुविधा व इतर आवश्यक सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यंदाची वारी सुरक्षित, आरोग्यदायी आणि आनंदमय वातावरणात पार पडणार असल्याचे सूतोवाच त्यांनी व्यक्त केला.

गटविकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले,  इंदापूर तालुक्यातील पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाने यंदा वारकऱ्यांसाठी व्यापक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून मुक्कामस्थळी व विसाव्याच्या ठिकाणी मोठे वॉटरप्रूफ जर्मन हँगर व मंडप उभारले जाणार आहेत. सर्व पालख्यांसाठी मिळून सुमारे १,७०० फिरती शौचालये उपलब्ध केली जाणार आहेत. महिलांसाठी ६०० बंदिस्त स्नानगृहे, मोबाईल चार्जिंग पॉइंट, फूट मसाजर, पिण्याच्या पाण्यासाठी ८५ टँकर व १८ फीडिंग पॉइंटची व्यवस्था करण्यात आली आहे. १४ तात्पुरती आरोग्य केंद्रे, हिरकणी कक्ष, अग्निशमन सुविधा, वारीनंतर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

नगराध्यक्ष भरत शहा म्हणाले, इंदापूर शहराचे वैभव असलेले पालखी रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. मात्र पालखी सोहळ्यासाठी ग्रामीण भागात वीज खंडित झाल्यास त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नियमित वीज उपलब्ध असणे गरजेचे आहे. यावेळी सार्वजनिक मंडळांना वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी गॅस उपलब्ध करून द्यावा तसेच इंदापूरच्या पालखीतळाला सर्व बाजूंनी संरक्षणात्मक व्यवस्था करून कायमस्वरूपी सुविधा निर्माण करावी अशी मागणी त्यांनी केली.  पालखीतळावरील पाण्याची टाकी व शौचालयासाठी मंजूर दोन कोटी रुपयांच्या कामाला आयटीआयचा ना हरकत दाखला मिळत नसल्याने येत असणारा अडथळा दूर करण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे अशी सूचना त्यांनी केली.

जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गट नेते श्रीमंत ढोले यांनी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. संत सोपान काका पालखी मार्गाच्या लाखेवाडी-सराटी रस्त्यासाठी १५१ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे त्यांनी अभिनंदन केले. पीडब्ल्यूडीच्या खराब रस्त्यांची दुरुस्ती, नॅशनल हायवेवरील खड्डे बुजविणे, लोडशेडिंग कमी करणे, कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, अपूर्ण वीजजोडण्या पूर्ण करणे, पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या शिफारशींना न्याय देऊन प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन कांबळे, उपसभापती जयकुमार कारंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य सोनाली जाधव, पंचायत समिती सदस्य रणजीत भोंग, उपनाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, गटनेते शकील सय्यद, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, शुभम पवार, उमेश मखरे, पोपट शिंदे, अमर नलवडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

चौकट: जिल्हा परिषद सदस्या निर्मला सागर मिसाळ यांनी प्रशासकीय भवन मधील स्वच्छता गृहातील स्वच्छतेकडे तसेच दुर्गंधीकडे सर्वांचे लक्ष वेधले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा