इंदापूर, डॉ. संदेश शहा. शुक्रवार, १७ जुलै २६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांची परंपरा ही महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक,
आध्यात्मिक भक्तीची परंपरा असून हा समाज जीवनातील अमूल्य ठेवा आहे. आध्यात्मिक पंढरीकडे जाणारे, समतेचा संदेश देणारे पालखी सोहळे हे जगातील अद्वितीय असे प्रेरणादायी सोहळे आहेत, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी दि. १७ जुलै रोजी काढले.
हर्षवर्धन पाटील हे बेलवाडी ( ता. इंदापूर ) येथे संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल सोहळ्यास उपस्थित होते. यानिमित्त संवाद साधताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले, संपूर्ण जगात महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या पवित्र भूमीतील पालखी सोहळे ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असून, संतांच्या विचारांचा प्रसार तसेच बंधुता, प्रेम आणि एकतेचा संदेश देण्याचे कार्य हे वारकरी संप्रदाय अविरतपणे अनेक शतकांपासून करत आहे. सध्या राज्यावर पावसाच्या कमतरतेचे संकट आहे. खरिपाच्या पेरण्या सुमारे ५० टक्के एवढ्याच झालेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात दमदार पाऊस होऊन शेती सुजलाम सुफलाम व्हावी तसेच प्रत्येकाचा संसार प्रपंच आनंदी रहावा, समाजामध्ये आपुलकीची भावना कायम राहावी अशी तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना केल्याचे याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
या रिंगण सोहळा प्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आदी मान्यवरांच्या हस्ते तुकोबारायांच्या पादुकांची आरती करण्यात आली. यावेळी या नेत्यांनी एकमेकांशी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील व मान्यवर राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोष करत पायी चालत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा