*अकलूज प्रतिनिधी*
*केदार --लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
देशाच्या सीमेवर रात्रंदिवस कर्तव्य बजावत देशाचे संरक्षण करणारे सैनिक,जवान तसेच २४ तास जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले पोलीस यांच्याप्रती बहीण-भावाच्या प्रेमाचा संदेश पोहोचविण्याचा अनोखा उपक्रम श्रीपूर (ता.माळशिरस) येथील शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान गेल्या तब्बल १६ वर्षांपासून अखंडपणे राबवत आहे.यंदाही प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांसह परिसरातील महिला भगिनींनी राख्या एकत्रित करून श्रीपूर पोस्ट ऑफिसमधून देशाच्या विविध सीमेवरील भागांतील जवान,सैनिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविल्या.
श्रीपूर (ता. माळशिरस) येथील शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान गेल्या १६ वर्षांपासून सैनिक,पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.देशाच्या रक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या सैनिकांना आणि सतत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना अनेकदा आपल्या कुटुंबीयांसोबत सण-उत्सव साजरे करता येत नाहीत.ही भावना लक्षात घेऊन राखी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राख्या पाठवून त्यांच्याशी भावनिक नाते जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.या उपक्रमात प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरेखा जाधव,उपाध्यक्षा सविता नाईकनवरे,सचिव सारिका नाईकनवरे,सदस्य विजया नाईकनवरे,नगरसेविका तेजश्री लाटे,हर्षदा नाईकनवरे या महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच धर्मेश जाधव आणि माधव साठे सर यांनीही या उपक्रमात सहकार्य केले.या उपक्रमासाठी श्रीपूर पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर अश्विनी शेटे,असिस्टंट पोस्टमास्तर पुनम सोनार,पोस्टमन शितल येवले आणि पॅकर सुरज कुंटे यांनी राख्या पाठविण्यासाठी चांगली व्यवस्था व सहकार्य केले.त्यामुळे महिला भगिनींकडून पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
देशाचे संरक्षण करताना सीमेवरील सैनिक आणि जवान आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असतात. त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारीही रात्रंदिवस जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात.कर्तव्यामुळे त्यांना अनेकदा राखी पौर्णिमेसारखे सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरे करता येत नाहीत.अशा वेळी श्रीपूरच्या महिला भगिनींकडून आलेली राखी आणि शुभेच्छापत्र त्यांच्यापर्यंत बहिणीच्या प्रेमाचा संदेश घेऊन पोहोचणार आहे.
गेली १६ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमातून शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असून,देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक,जवान आणि पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना सहभागी महिला भगिनींनी व्यक्त केली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा