Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२६

*‘AI तारक की मारक?’ वाद-विवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण मांडणी* *उमरगा तालुक्यातील १९ शाळांचा उत्स्फूर्त सहभाग; महात्मा बसवेश्वर विद्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक*

 *उमरगा-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


उमरगा : प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा आणि जिल्हा परिषद प्रशाला, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘AI (Artificial Intelligence – कृत्रिम बुद्धिमत्ता) मानवासाठी तारक की मारक?’ या विषयावरील वाद-विवाद स्पर्धा शुक्रवारी जिल्हा परिषद प्रशाला, उमरगा येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेला उमरगा तालुक्यातील १९ शाळांच्या संघांनी सहभाग नोंदविला असून एकूण ३८ विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व आणि वैचारिक क्षमता सादर केली.


स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद, धाराशिवच्या उपाध्यक्षा सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शांताबाई चव्हाण होत्या. यावेळी ॲड. शीतल चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पद्माकर मोरे, शालेय समिती अध्यक्षा सौ. सुजाता मोरे, श्री. अशोक पतगे, सौ. शारदा माळी, माजी मुख्याध्यापक श्री. मधुकर मम्माळे, ॲड. अर्चना जाधव, व्यंकट भालेराव व किशोर बसगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगिता आणि संभाव्य धोक्यांवर स्पर्धकांनी अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही बाजूंनी प्रभावी मते मांडली. शिक्षण, आरोग्य, विज्ञान, उद्योग, रोजगार आणि दैनंदिन जीवनात AI मुळे होत असलेल्या बदलांपासून ते रोजगारांवरील परिणाम, तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्व, गोपनीयता, सायबर गुन्हे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनियंत्रित वापरातून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांपर्यंत विविध मुद्द्यांना विद्यार्थ्यांनी स्पर्श केला. अभ्यासपूर्ण आशय, मुद्देसूद मांडणी आणि ओघवत्या वक्तृत्वामुळे स्पर्धा रंगतदार झाली.



स्पर्धेचे परीक्षण डॉ. बालाजी मदन इंगळे आणि सौ. रेखाताई सूर्यवंशी यांनी केले. विद्यार्थ्यांची विषयाची समज, अनुकूल-प्रतिकूल बाजूंची मांडणी, वक्तृत्व, मुद्देसूदपणा आणि सादरीकरण यांचा विचार करून विजेत्यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेत श्री. महात्मा बसवेश्वर विद्यालय, उमरगा या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर श्री. महात्मा गांधी विद्यालय, केसर जवळगा यांना द्वितीय आणि आदर्श विद्यालय, उमरगा यांच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला. भारत विद्यालय, उमरगा यांच्या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

विजेत्या संघांना अनुक्रमे रु. २१००, रु. १५०० व रु. १२०० रोख पारितोषिकासह चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १९ शाळांच्या संघांना सहभागी चषक आणि प्रत्येक स्पर्धक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

विद्यार्थ्यांना केवळ वक्तृत्वाची संधी उपलब्ध करून देण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाकडे चिकित्सक नजरेने पाहण्याची दृष्टी निर्माण व्हावी, नव्या तंत्रज्ञानाच्या संधी आणि त्यातील धोके या दोन्हींचा विचार करण्याची सवय लागावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला शाळा व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा