अकलूज प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मूळ इंदापूरचे भूमिपुत्र असलेले तसेच सध्या पुण्यामध्ये वास्तवास असलेले ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन ( वय ८०) यांचे शुक्रवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक पुरोगामी विचार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात कन्या व परिवार आहे.
जेष्ठ नेते शरद पवार, मोहन जोशी, अंकुश काकडे, विश्वंभर चौधरी, शमशुद्धीन तांबोळी,महेश ढमढेरे, मनोहर सातव, इंदापूर येथील ॲड. राजेंद्र तांबिले, ॲड. कृष्णाजी यादव, महारुद्र पाटील, भास्कर गुरगुडे, कृष्णाजी ताटे, पत्रकार मधुकर गलांडे व नागनाथ शिंगाडे, गफूर सय्यद, रमेश शिंदे, संदीपान कडवळे, समद सय्यद, शिवाजी जगताप, राजेंद्र विधाटे, धनंजय लंबाते, अनिल गायकवाड, राजेश गायकवाड, पराग गायकवाड आदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. रत्नाकर महाजन यांचा
१४ जून १९४६ रोजी इंदापूर ( जि. पुणे) येथे जन्म झाला. सन १९६४ ला इंदापूर येथे त्यांनी श्री नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये शालांत शिक्षण पूर्ण केले. १९६४-६७ मध्ये नाशिक येथे महाविद्यालयीन ( वैद्यकीय ) शिक्षण पूर्ण. याच काळात त्यांनी सार्वजनिक कार्यास प्रारंभ केला. विद्यार्थी चळवळीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केली. वाद विवाद स्पर्धा, परिषदा व सभांचे आयोजन केले. नाशिक येथील वसंत व्याख्यानमालेचा सहचिटणीस म्हणून काम पाहिले. गावकरी या वृत्तपत्रातून सामाजिक व राजकीय लेखन केले. १९६९ मध्ये वैद्यकीय पदवी मिळवली. धुळे, नाशिक व मुंबई येथे सरकारी व निम सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली. १९७१ मध्ये युवक क्रांती दलाचा सक्रिय सदस्य, याच काळात युक्रांदच्या विविध आंदोलनात सहभाग व तुरुंगवास. १९७२ मध्ये दुष्काळग्रस्त समितीच्या वतीने मराठवाडा व खानदेशातील दुष्काळग्रस्तांसाठी गेलेल्या वैद्यकीय पथकात सक्रिय सहभाग. सन १९७३ मध्ये मुंबईच्या चिल्ड्रन्स एड सोसायटीतील वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन ते पुण्यात स्थायिक झाले.
१९७३-७५ काळात युक्रांदचा सेक्रेटरी म्हणून महागाई, बेकारी, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला, त्यांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. दिनांक २५ जून १९७५ काळात आणीबाणीचा निषेध करण्यासाठी शनिवार वाड्यासमोरील सर्वपक्षीय सभेत त्यांनी भाषण केल्यानंतर ते भूमिगत झाले. आणीबाणी विरोधी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दिनांक २ ऑक्टोबर १९७५ रोजी दिल्ली येथील राजघाटा वरील महात्मा गांधींच्या समाधी जवळ प्रार्थना सभेत इंदिरा गांधी समोर महाराष्ट्रातील निवडक सहकाऱ्यांसह त्यांनी सत्याग्रह केला. सत्याग्रहामुळे तिहार जेलमध्ये तुरुंग अधिकाऱ्याच्या लाठी हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांना दीड वर्ष तुरुंगवास झाला. याच काळात ह.वी. कामथ, चरणसिंग, प्रकाश सिंह बादल, किशन पटनायक आदी नेत्यांचा त्यांचा परिचय व सहवास झाला. सन १९७७ मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश करून पूर्णवेळ पक्ष कार्य केले. एस. एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली ते राज्य कार्यकारणी सदस्य बनले. पक्षाच्या उमेदवारासाठी त्यांनी राज्यभर दौरा केला. १९८४-८८ त्या काळात महाराष्ट्र जनता पक्षाचा सरचिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. याच काळात पक्ष बांधणीसाठी राज्यभर प्रचार व दौरे केले. त्यांचे निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान होते. याच काळात त्यांनी राज्याबाहेर देखील दौरे केले. त्यामुळे विविध नेत्यांशी मैत्रीचे संबंध जोडले. याच काळात इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी १५ दिवस त्यांनी पदयात्रा काढली.
विधानसभा निवडणुकीत पुलोदच्या निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. याच काळात अनेक सामाजिक व सांस्कृतिक संघटनात त्यांनी सहभाग घेतला. पुण्यातील बुद्धी प्रामाण्यवादी मंच या संघटनेचे ते संस्थापक सदस्य, प्रथम कार्यवाह व नंतर अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. या मंचाद्वारे विज्ञान निष्ठेचा व अंधश्रद्धा निर्मूलनाचा त्यांनी प्रचार केला. लोकबोधिनी संस्थेच्या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आगरकर वाद विवाद स्पर्धा त्यांनी अनेक वर्ष चालविली. लोकबोधिनी तर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त २५ वर्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. महात्मा गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी विविध महाविद्यालयात व्याख्याने दिली. लोक स्वतंत्रता संघटनेत न्यायमूर्ती तारकुंडे व डॉ. रजनी कोठारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. याच संघटनेतर्फे त्यांनी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची महाराष्ट्र राज्यव्यापी परिषद आयोजित केली. झोपड्यांच्या समस्यावर त्यांनी परिसंवादाचे आयोजन केले. पोलीस अत्याचाराविरोधी आवाज उठविला. सामाजिक समतेसाठी परिसंवाद आयोजित केला.
विविध वर्तमानपत्रात सामाजिक समस्यांवर लेखन केले. युक्रांदच्या संवाद या मुखपत्राचे पाच वर्षे संपादन व लेखन केले. पुरोगामी त्रैमासीकाचे संपादन केले. दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीच्या वर्धापन दिनाला ते दरवर्षी आवर्जून उपस्थित राहत होते. त्यांनी काँग्रेसच्या शिदोरीचे संपादन केले.
सत्य वदे वचनाला, विदर्भाचे मृगजळ, ऐरण आणि घन, प्रबोधनाच्या नव्या वाटा आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
जनता दलातर्फे पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघात विधानसभेची निवडणूक लढवली होती.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेत तसेच जाहीरनामा तयार करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. शरद पवार यांचे ज्येष्ठ विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेस- राष्ट्रवादी या आघाडी सरकारमध्ये दोन वेळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांचा मानव विकास अहवाल विशेष गाजला होता. राज्याच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेची आखणी केली. यावेळी तालुक्याला उच्च पद मिळाल्याबद्दल डॉ. रत्नाकर महाजन यांचा इंदापूर मध्ये भव्य मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर राजकीय वैचारिकतेतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. काँग्रेसने राज्य प्रवक्ते पदाची त्यांच्यावर जबाबदारी दिली. पक्षाची परखड वैचारिक भूमिका मांडण्याचे त्यांनी काम केले.
विविध वाहिन्यांवर ते अभ्यासपूर्ण मत व्यक्त करत असत. राष्ट्रसेवा दलातही त्यांनी अनेक वर्ष विचार मंथन केले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, ग. प्र. प्रधान, ना.ग.गोरे, भाई वैद्य, मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, चंद्रशेखर, व्ही.पी.सिंग, डॉ.बाबा आढाव, डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या विचाराचा त्यांच्यावर पगडा होता.
आज शनिवारी पिंपळे निलख येथील निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार, हितचिंतक व मान्यवरांनी भेट देऊन डॉ. रत्नाकर महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
इंदापूर तालुक्याच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील घाट, इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालय, बाभूळगाव येथील रस्ते तसेच तालुक्यात विविध विकासकामांसाठी त्यांनी योगदान दिले. इंदापूर तालुक्यातील बुद्धिप्रमाणवादी नेते म्हणून त्यांना ओळखले जात होते.
*फोटो:- मान्यवरांबरोबर आठवणीतले डॉ. रत्नाकर महाजन.
शनिवार, १२ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन.
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन.
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा