*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
राजुरी ता.करमाळा येथील श्री राजेश्वर विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक स्व.सुखदेव साखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा स्व.सुखदेव साखरे स्मृती पुरस्कार या वर्षी बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता दादाराव धावणे यांना घोषित झाला आहे.
स्व. सुखदेव साखरे यांनी अत्यंत अभावग्रस्त व आव्हानात्मक परिस्थितीमध्ये राजुरी येथील श्री. राजेश्वर विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक म्हणून धुरा सांभाळली व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या साठी अपार कष्ट घेतले. समाजातील विविध क्षेत्रामध्ये स्व.साखरे सरांचे अनेक विद्यार्थी आपापल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. एक ध्येयवादी शिक्षक व एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून स्व.सुखदेव साखरे सरांचे कार्यकर्तृत्व आजही आदर्शवत व प्रेरणादायी आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणक्षेत्रात भरीव काम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील एका उपक्रमशील मुख्याध्यापकाला दरवर्षी स्व. सुखदेव साखरे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येते. स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि अकरा हजार रूपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिक्षकदिनाच्या दिवशी पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. संजय चौधरी यांनी या पुरस्कारासाठी मुख्याध्यापिका कविता धावणे यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी सोलापूरच्या स्टडी सर्कलचे संचालक श्री.सतिश मोरे, विठ्ठल देशमुख, विक्रीकर अधिकारी तुकाराम जाधव, कृषि पर्यवेक्षक नानासाहेब साखरे, कृषि अधिकारी देवीदास सारंगकर, उद्योजक प्रवीण साखरे, कुंडलिंक साखरे हे संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
बुधवार दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता सुप्रसिद्ध साहित्यीक प्रा.डॉ. राजेंद्र दास यांच्या हस्ते राजुरी ता. करमाळा येथे या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण होणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा