Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६

चव्हाण वाचनालयात ‘पुस्तक वाचणाऱ्या गणरायाची’ प्रतिष्ठापना* *गणरायाला पुस्तकांचा प्रसाद; भाविकांनाही प्रसाद म्हणून पुस्तकेच देण्याचा अनोखा उपक्रम*

*उमरगा प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* उमरगा येथील प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय तथा ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या संपर्क कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त ‘पुस्तक वाचणाऱ्या गणरायाच्या’ मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून श्रद्धा आणि भक्तीला ज्ञान, विचार व वाचनसंस्कृतीची जोड देत गणेशोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी तसेच पहिल्या आरतीसाठी मातोश्री शांताबाई चव्हाण, प्रा. राजू बटगिरे, ॲड. ख्वाजा शेख, ॲड. अर्चना जाधव, मयूर कटके, कविता साळी, संतोष चव्हाण आणि किशोर बसगुंडे यांच्यासह ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व वाचनप्रेमी उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करून उपस्थितांच्या हस्ते पहिली आरती करण्यात आली. ॲड. शीतल शामराव चव्हाण यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपल्या मूळ गावी सुरू केलेल्या ‘प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या’ माध्यमातून वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. सण, उत्सव आणि सामाजिक प्रसंगांना वाचन चळवळीशी जोडून नागरिकांमध्ये पुस्तकांविषयी आवड निर्माण करणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गणपतीला बुद्धी, विद्या आणि विवेकाची देवता मानले जाते. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून वाचनालयात दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात पुस्तक वाचणाऱ्या गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. या गणरायाला वर्गणी, मोदक, दुर्वा, फुलांचे हार अथवा फळांऐवजी पुस्तके अर्पण करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येते. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही पारंपरिक प्रसादाऐवजी पुस्तकांचाच प्रसाद दिला जातो. गणरायाला प्रसादरूपाने अर्पण झालेली सर्व पुस्तके उत्सवानंतर वाचनालयात समाविष्ट करून वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे गणेशोत्सवातील प्रत्येक पुस्तक थेट एखाद्या वाचकापर्यंत पोहोचते आणि ज्ञानाचा प्रसाद समाजामध्ये निरंतर वाटला जातो. “हा आमच्यासाठी केवळ धार्मिक उत्सव नसून विद्येचा, विचारांचा, विवेकाचा आणि वाचनसंस्कृतीचा उत्सव आहे. श्रद्धेला ज्ञानाची आणि उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. नागरिकांनी गणरायाला आपल्या आवडीची आणि शक्यतेनुसार पुस्तके अर्पण करून या वाचन चळवळीला बळ द्यावे,” असे आवाहन वाचनालयाचे संस्थापक ॲड. शीतल शामराव चव्हाण यांनी केले. गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच पुस्तकप्रेमींनी वाचनालयाला भेट देऊन पुस्तक वाचणाऱ्या गणरायाचे दर्शन घ्यावे, गणरायाला पुस्तकांचा प्रसाद अर्पण करावा आणि स्वतःही पुस्तकांचा प्रसाद स्वीकारून ज्ञान, विचार व विवेकाचे शुभाशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन वाचनालय आणि फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा