Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

*असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा; मुला-मुलींनी सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाची जाणीव ठेवावी : न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे*


*मुख्यसंपादक* 
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*


सोलापूर : किशोरवयात प्रवेश करताना मुला-मुलींनी सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शातील फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. असुरक्षित स्पर्श हा अनुचित वर्तन असून, परिस्थितीनुसार तो कायद्याच्या कक्षेत येणारा गंभीर गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जागरूक राहून कोणत्याही अनुचित प्रकाराला घाबरून न जाता विश्वासू व्यक्ती अथवा संबंधित यंत्रणेकडे माहिती द्यावी, असे प्रतिपादन न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने झोपडपट्टी भागातील वस्तीपातळीवरील  प्राथमिक शाळेत सुरक्षित-असुरक्षित स्पर्श, लैंगिक गुन्हे तसेच पॉक्सो कायदा याबाबत आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मंचावर ॲड. चैतन्य केंगार, ॲड. अनुराधा कदम, ॲड. लक्ष्मण पाटील, मुख्याध्यापिका फरजाना आत्तार, प्राचार्य नारायण जगताप, माऊली अवताडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची, कायदेशीर संरक्षणाची तसेच अडचणीच्या प्रसंगी उपलब्ध असलेल्या मदतीची माहिती देण्यात आली. ॲड. लक्ष्मण पाटील यांनी बालकांचे हक्क व बालविवाह प्रतिबंधक कायदा याबाबत मार्गदर्शन केले. ॲड. चैतन्य केंगार यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पुरविण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवा, कायदेविषयक सल्ला व सहाय्याबाबत माहिती दिली.

ॲड. अनुराधा कदम यांनी शिक्षणाचा अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमादरम्यान विविध प्रश्न उपस्थित केले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. बालकांमध्ये लहान वयापासून सुरक्षिततेची जाणीव आणि कायदेविषयक सजगता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे मत शाळेच्या मुख्याध्यापिका फरजाना अत्तार व माऊली अवताडे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव अमोलकुमार देशपांडे यांच्या देखरेखीखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी व विधी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा