इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी,
दि. ९ सप्टेंबर २०२६
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त इंदापूर शहरात लोकनियुक्त नगराध्यक्ष भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित मानाची दहीहंडी इंदापूर येथील महात्मा फुले दही हंडी मंडळाने सात मनोरे रचून फोडताच गोविंदा रे गोविंदाचा जयघोष झाला. यासोबत सांस्कृतिक महोत्सवातील फोक प्रबोधनातून राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकधारा संवर्धित करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी हजारो नेत्रांनी हा नयनमनोहर सोहळा आपल्या नयनात साठवून ठेवला. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, नगराध्यक्ष भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दहीहंडी सोहळा संपन्न झाला. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आज आपले नेते अजितदादा पवार यांची खूप आठवण येत आहे. त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या विचारांचा वारसा तसेच शिकवण केंद्रबिंदू मानून इंदापूरचा विकास केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. लोकनियुक्त नगराध्यक्ष भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने सोमवारी दि. ७ सप्टेंबर रोजी इंदापूर पोलीस ठाण्याच्या समोर जुन्या बाजार समिती प्रांगणात संपन्न झालेल्या या दहीहंडी सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या दहीहंडी सोहळ्यात स्वराज दहीहंडी संघ, शिवशंभू दहीहंडी संघ आणि महात्मा फुले दहीहंडी संघ यांनी सहभाग घेतला. यामध्ये युवा नेते गौरव राऊत यांच्या नेतृत्वाखालील महात्मा फुले दहीहंडी संघाने तब्बल सात मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. यावेळी उपस्थित नागरिकांनी
जल्लोष करत गोविंदांच्या शौर्याला दाद दिली. विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
दहीहंडी सोहळ्यास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक अविनाश घोलप, जिल्हा परिषद सदस्या सोनाली जाधव, शोभा भरणे, वसंत मोहोळकर, देवराव जाधव, राहुल जाधव, हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद गट नेते श्रीमंत ढोले, वसंत मोहोळकर, श्री नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मुकुंद शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशाली शहा,
ॲड पूजा घोलप, पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन लोंढे, नगरसेविका दीप्ती राऊत, सुनीता वाघ, रुचिरा शहा, अंगद शहा, रामकृष्ण मोरे, शिवाजीराव मखरे, संदीपान कडवळे, श्रीनिवास माने, अमोल माने, अरशाद सय्यद, शकील सय्यद, अक्षय सूर्यवंशी, प्रशांत उंबरे, उमेश मखरे, गणेश महाजन, अण्णा ढावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
दहीहंडी सोहळ्याला केवळ मनोरंजनाची जोड न देता फोक प्रबोधन च्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा देखील संदेश देण्यात आला. लोककला, संगीत आणि प्रभावी सादरीकरणातून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात आली. त्यामुळे दहीहंडीचा उत्सव हा केवळ थराराचा नव्हे, तर सामाजिक बांधिलकी संवर्धन करण्याचा संदेश देणारा सोहळा ठरला.
या कार्यक्रमात हर्षदा ढोले यांच्या नेतृत्वाखालील हिरकणी ढोल पथकाने आपल्या दमदार वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण केले. कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इंदापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्ष भरत शहा यांनी माताभगिनी, युवक, नागरिक, पोलीस प्रशासन, आणि कलाकारांचे आभार मानले.
दरम्यान कार्यक्रमाची गोडी उत्तरोत्तर वाढत असताना गाण्यावर नगराध्यक्ष भरत शहा, मुकुंद शहा तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक मधुकर भरणे यांनी नृत्य करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा