इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
बुधवार, ९ सप्टेंबर २०२६
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
" झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा ”, “एक झाड लावूया, एक झाड जगवूया, हरित इंदापूर घडवूया ” असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षप्रेमी सामाजिक संस्था, इंदापूरचा प्रथम वर्धापन दिन वृक्षारोपणाने उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, वृक्षसंगोपन, पक्षी संवर्धन तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इंदापूर येथील वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन दिनाचा कार्यक्रम पालखी विसावा स्थळ, इंदापूर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते वृक्षलागवड करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मालोजीराजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संजय चौगुले सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पवित्र कृष्णतुळशीच्या रोपांच्या कुंड्या भेट देऊन पर्यावरणपूरक व प्रेरणादायी पद्धतीने केले
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, नगरसेवक उमेश मखरे, अक्षय सूर्यवंशी, प्रशांत उंबरे, अजिंक्य जावीर, रोटरी अध्यक्ष भीमाशंकर जाधव, एलआयसी शाखा इंदापूरचे व्यवस्थापक उदय बनसोड, पक्षीप्रेमी अर्जुन जाधव, क्रीडा संकुल कर्मचारी अशोक करे तसेच सनदी लेखापाल प्रशांत भिसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या वतीने भागवत घनवट यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या संपूर्ण एका वर्षाच्या वाटचालीचा आढावा सादर करत संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
संस्थेच्या या पर्यावरणीय कार्यामध्ये सर्वांची मिळालेली साथ आणि संस्थेची पुढील वाटचालही सर्वांच्या सहकार्याने अधिक व्यापक व्हावी, ही छोटीशी पर्यावरण चळवळ भविष्यात वटवृक्षाप्रमाणे बहरावी, अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करण्यात आली.
यावेळी सचिन खुडे, रमेश ढगे, भीमाशंकर जाधव, उदय बनसोड तसेच अक्षय सूर्यवंशी यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. वैयक्तिक नौकरी, व्यवसाय व दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळून विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र घेऊन प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण व समाजासाठी काम करणारी अशी संस्था इंदापूरमध्ये विशेष प्रेरणादायी आहे. ही संस्था केवळ कागदोपत्री मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून वृक्षलागवड, वृक्षसंगोपन, पशुपक्षी संवर्धन, स्वच्छता मोहीम, सांप्रदायिक, सामाजिक उपक्रम तसेच गरजू व कष्टकरी बांधवांची दिवाळी गोड करण्यासारखे विविध उपक्रम सातत्याने राबवत असल्याबद्दल मान्यवरांनी सर्व वृक्षप्रेमींचे कौतुक केले. या संस्थेच्या कार्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असल्याचे सर्वच मान्यवरांनी सांगितले.
संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये मोलाचे सहकार्य करणारे मालोजीराजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या या कार्यात प्रशासनाच्या वतीने आगामी काळात सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही उपस्थित प्रशासनातील मान्यवरांनी दिले. यानंतर वृक्षप्रेमी अक्षय धायगुडे यांनी संस्थेची व्याप्ती मोरोची, पडस्थळ, शिंगाडे वस्ती ठिकाणी वृक्षप्रेमी सामाजिक संस्था स्थापन केल्याचे सांगितले तसेच येणाऱ्या काळामध्ये निमगाव, बावडा, विठ्ठलवाडी, बिजवडी या गावांमध्ये वृक्षप्रेमी संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट मांडले.
यानंतर संस्थेचे सचिव सुनील नरुटे यांनी उपस्थित सर्वांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार विशाल रणवरे यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा