Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

*करमाळ्यात दहीहंडीच्या निमित्ताने फुटली मोठी राजकीय हंडी*! *माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश*

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मात्र, दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या एका महत्त्वपूर्ण राजकीय प्रवेशामुळे करमाळ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दहीहंडी फोडण्याबरोबरच  काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. 


त्यांच्यासोबत  करमाळा तालुका काँग्रेस आयचे भटक्या विमुक्त जातीचे तालुकाध्यक्ष श्री देवराव अण्णा सुकळे,शिवसेनेचे युवक नेते संभाजी शिंदे, शहर युवकचे शहराध्यक्ष सुजय जगताप, योगेश राखुंडे यांच्यासह काँग्रेसचे सर्व उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी तसेच पक्षाच्या विविध शाखेचे शाखाध्यक्ष इतर सर्व पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.


त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवात केवळ गोविंदा पथकांनीच हंडी फोडली नाही, तर करमाळ्यात मोठी ‘राजकीय हंडी’ देखील फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपचे नूतन सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणल्याने भाजपच्या संघटनात्मक बांधणीला मोठी चालना मिळाल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात या पक्षप्रवेशाचा करमाळा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रतापराव जगताप हे माजी आमदार नामदेवराव जगताप यांचे चिरंजीव असून करमाळा तालुक्यात त्यांचे कार्यकर्त्यांचे व समर्थकांचे चांगले संघटन असल्याचे मानले जाते. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसला असून भाजपला मात्र स्थानिक पातळीवर एक मजबूत राजकीय चेहरा आणि संघटनात्मक बळ मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रतापराव जगताप यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे विचार, विकासाची भूमिका आणि ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, दहीहंडीच्या निमित्ताने झालेला हा राजकीय प्रवेश आगामी काळातील करमाळ्याच्या राजकारणाची दिशा बदलणारा ठरणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्व, गणेश चिवटे यांची संघटनात्मक रणनीती आणि प्रतापराव जगताप यांचे स्थानिक संघटन यांचा मेळ भाजपला करमाळ्यात कितपत बळकटी देतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

एकंदरीत, दहीहंडीच्या उत्सवात फुटलेली ही ‘राजकीय हंडी’ करमाळ्याच्या राजकारणात आगामी काळात कोणते नवे समीकरण घडवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख... करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, करमाळा नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती राहुल भैया जगताप,

भाजपा मंडलाध्यक्ष काकासाहेब सरडे ,महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव,  नगरसेवक रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले पदाधिकारी व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून करमाळा तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा