Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६

नेहरू वसतिगृहाची दुरवस्था; विद्यार्थ्यांना सुविधांपासून वंचित ठेवणार का?* शिक्षक सेनेची पाहणीनंतर जिल्हा परिषद प्रशासनाला १५ दिवसांची मुदत; अन्यथा विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलनाचा इशारा

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
सोलापूर : ग्रामीण भागातून सोलापूर शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या नेहरू विद्यार्थी वसतिगृहाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. अस्वच्छ स्वच्छतागृहे, दुर्गंधी, खोल्यांना दरवाजे व खिडक्या नसणे, तुटलेल्या विद्युत फिटिंग्ज, पंख्यांचा अभाव, तसेच कॉट, गादी, टेबल, खुर्ची व कपाटासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने केला आहे. दैनिक लोकमतमधून वसतिगृहातील स्वच्छतेचा प्रश्न समोर आल्यानंतर २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी अधीक्षक, लिपिक व स्वच्छता कर्मचारी उपस्थित नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. स्वच्छतेबाबत विचारणा केली असता संबंधितांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोपही करण्यात आला. या वसतिगृहात यावर्षी शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी दाखल झाले असून, विद्यार्थ्यांना अत्यंत अपुऱ्या सुविधांमध्ये राहावे लागत असल्याचे पाहणीत निदर्शनास आल्याचा दावा संघटनेने केला आहे. काही विद्यार्थी फरशीवर सतरंजी अंथरून अभ्यास करत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “शेतकरी, कष्टकरी, मजूर, दलित, मागासवर्गीय व बहुजन कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेऊन भविष्य घडविण्यासाठी येथे राहतात. त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” अशी भूमिका शिक्षक सेनेने घेतली आहे. *दहा मागण्यांचे निवेदन* वस्तीगृहातील प्रत्येक दोन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र खोली, खोल्यांना सुरक्षित दरवाजे व खिडक्या, रंगकाम, ट्यूबलाइट व पंखे, प्रत्येक विद्यार्थ्यास कॉट व गादी, टेबल-खुर्ची व कपाट, स्नानगृहात शॉवर, स्वच्छ व सुरक्षित शौचालये, स्नानगृह व शौचालयांना वॉटरप्रूफ दरवाजे, नियमित परिसर स्वच्छता तसेच २४ तास फिल्टर केलेल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची नियमित TDS तपासणी करून त्याची नोंद ठेवावी, तसेच वसतिगृह अधीक्षकांनी दर पंधरा दिवसांनी स्वच्छता, पिण्याचे पाणी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत जिल्हा परिषदेला अहवाल सादर करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. *“अधिकाऱ्यांनी एक दिवस वसतिगृहात मुक्काम करून पाहावे!”* निवेदन प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांत मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः वसतिगृहात एक दिवस मुक्काम करून तेथील शौचालय व स्नानगृह वापरून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी, असे आव्हान शिक्षक सेनेने दिले आहे. *"विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा नाकारून त्यांना अमानवी परिस्थितीत ठेवले जात आहे. प्रशासनाने तातडीने संवेदनशीलतेने दखल न घेतल्यास नेहरू वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."* विजयकुमार गुंड जिल्हाध्यक्ष , शिक्षक सेना सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा