Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

*तामलवाडी-काटगाव-मंगरुळ जलजीवन मिशनच्या कामाची फेरचौकशी करा; दोषींवर कठोर कारवाईची माजी सैनिकांची मागणी* *नियमबाह्य आणि निकृष्ट कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार*

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी-काटगाव-मंगरुळ येथे जलजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अंदाजपत्रकाबाहेर जाऊन केले जात असल्याचा गंभीर आरोप येथील सजग नागरिक तथा माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी केला आहे. या योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून, याची वरिष्ठांमार्फत 'फेरचौकशी' करण्याची मागणी त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे व ई-मेलद्वारे केली आहे. या संदर्भात मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या या योजनेमध्ये काटगाव ते तामलवाडी PWD रस्त्यालगतची पाईपलाईन अत्यंत चुकीच्या पद्धतीने व कमी खोलीवर टाकण्यात आली आहे. नियम आणि अंदाजपत्रकानुसार ही पाईपलाईन योग्य खोलीवर (किमान ३ फूट) असणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात ती केवळ १ ते दीड फूट खोलीवरच पुरण्यात आली आहे. सध्या हा रस्ता अरुंद असून, भविष्यात रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास किंवा शेतकऱ्यांची ऊस व धान्याची अवजड वाहने गेल्यास पाईपलाईन दबून फुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यांची तोडफोड आणि दूषित पाण्याचा धोका तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, तामलवाडी गावांतर्गत मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची पाईपलाईन टाकताना मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. हे तोडलेले रस्ते कंत्राटदाराने पूर्ववत करून न दिल्याने सध्या जागोजागी खड्डे आणि पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती (लीकेज) लागली असून, नाल्यातील आणि गटारीतील अशुद्ध पाणी पुरवठ्यामध्ये मिसळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे गावात कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. *मुख्यमंत्र्यांकडून दखल, तरीही प्रशासनाची दिरंगाई?* या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाने सदर तक्रार ग्रामविकास विभाग, नगर विकास विभाग तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे पुढील योग्य चौकशी आणि कारवाईसाठी वर्ग (फॉरवर्ड) केली आहे. मात्र, यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आलेल्या चौकशीच्या वेळी तक्रारदाराला जाणूनबुजून अनुपस्थित ठेवण्यात आले व केवळ 'एकतर्फी' चौकशी उरकण्यात आली, असा आरोप श्री सावंत यांनी केला आहे. १० दिवसांत चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा या निकृष्ट कामाची मोजमाप पुस्तिकेनुसार (MB Book) पुन्हा स्वतंत्र आणि पारदर्शक फेरचौकशी करण्यात यावी; तोडलेले अंतर्गत रस्ते दुरुस्त करून कंत्राटदाराकडून नुकसान भरपाई घ्यावी आणि दोषी कंत्राटदार कंपनीवर थेट गुन्हा नोंदवून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. जर पुढील १० दिवसांत यावर लेखी व ठोस कारवाई झाली नाही, तर विभागीय आयुक्त आणि मा. लोकआयुक्त यांच्याकडे पुराव्यांसह दाद मागून तीव्र उपोषण छेडण्याचा इशारा माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी दिला आहे. आता या निकृष्ट कामावर प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा