*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील व धाराशिव जिल्ह्यासह ग्रामीण महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर 'उमेद' - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला बचत गटांनी घेतलेले कर्ज संपूर्णपणे माफ करावे, अशी मागणी आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तामलवाडीचे संस्थापक अध्यक्ष व माजी सैनिक श्री. सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री प्रताप सरनाईक व जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे. या ईमेल मध्ये त्यांनी शासनापुढे खालील बाबी मांडल्या आहेत
*महिला बचत गटांचे गणित बिघडले*
दुष्काळामुळे ग्रामीण भागात रोजगार पूर्णपणे ठप्प झाला असून हाताला काम नाही. 'उमेद' अभियानांतर्गत हजारो महिलांनी पशुपालन, दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक उद्योग व कौटुंबिक गरजांसाठी कर्ज घेतले आहे. मात्र चारा-पाण्याच्या टंचाईमुळे पशुधन जगवणे कठीण झाले असून दुग्ध व्यवसाय कोलमडला आहे. दैनंदिन घरखर्च भागवणे कठीण असताना बँकेचे व अभियानाचे हप्ते भरणे महिला भगिनींना अशक्य झाले आहे.
*कारवाईचा भिती*
या बिकट परिस्थितीमुळे अनेक महिला बचत गटांनी आपली नावे गुप्त ठेवत स्थानिक पंचायत समिती प्रशासनाला गुप्तपणे निवेदने देण्यास सुरुवात केली आहे. कारवाईची व पुढील कर्ज न मिळण्याची भीती यामागे असल्याचे समजते. ही मागणी आता एका गावापुरती मर्यादित न राहता संपूर्ण ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे.
*महिलांचे मनोगत*
महिला भगिनींचे म्हणणे आहे की, "जेव्हा दुष्काळात शेतकरी व इतर घटकांना मदत मिळू शकते, तर स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे राहू पाहणाऱ्या महिला बचत गटांना का नाही? निसर्गाच्या कोपामुळे आमचे कंबरडे मोडले आहे." जर या परिस्थितीत दिलासा दिला नाही, तर महिला पुन्हा एकदा सावकारी व खाजगी फायनान्सच्या जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे.
*प्रमुख मागण्या :-*
१) 'उमेद' मधील सर्व महिला बचत गटांचे चालू व थकीत कर्ज तात्काळ संपूर्ण माफ करावे.
२) कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत सर्व वसुली व हप्ते भरण्यास स्थगिती द्यावी.
३) थकीत कर्जावरील व्याज व दंड व्याज पूर्णपणे माफ करावे.
४) या बचत गटांचा CIBIL Score खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी व पुढील काळात नवीन कर्जासाठी पात्र ठेवावे.
या निवेदनाची प्रत CEO जिल्हा परिषद धाराशिव, प्रकल्प संचालक DRDA व गटविकास अधिकारी तुळजापूर यांनाही पाठविण्यात आली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा