Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२६

*शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; टोळीतील एकाला अटक, दोन साथीदारांचा शोध सुरू*_ *वरुडेत पाच घरफोड्या करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात*

*कार्यकारी संपादक* *एस. बी. तांबोळी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-8378081147*
-----वरुडे येथे एकाच वेळी पाच घरांमध्ये घरफोड्या करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. अनिल निदान भोसले (वय ४४, रा.थोरला मळा, मोराची चिंचोली, ता.शिरूर, जि.पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने दोन साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, फरार दोघांचा शोध सुरू असून, या टोळीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरुडे येथे चोरट्यांनी एकाच वेळी पाच घरांना लक्ष्य करत घरफोडी केली होती. या चोरीत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा अंदाजे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी विठ्ठल दत्तात्रय डांगे (वय ३७) यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) व ३३१ (४) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच वेळी पाच घरांमध्ये झालेल्या घरफोड्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलिसांना आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अनिल भोसले याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने दोन साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. वरुडेतील घरफोडी प्रकरणात एका आरोपीला अटक झाली असली, तरी त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. अटक केलेल्या आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचाही तपास सुरू असून, या कारवाईतून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, संदिप बनकर तसेच पोलीस अंमलदार नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे आणि भारत भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस हवालदार संदिप बनकर करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा