Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६

रेशनकार्डधारकांच्या नोटिसांवरील कारवाई तात्पुरती स्थगित करा, संबंधितांची प्रत्यक्ष पडताळणी व सुनावणी घेण्याबाबत शिवसेनेचे सुदर्शन रणवरे यांचे इंदापूर तहसीलदारांना निवेदन;

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी गुरुवार ८ ऑक्टोबर २६ सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापूर तालुक्यातील अनेक रेशनकार्डधारकांना शिधापत्रिकेबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नोटिसांवरील पुढील कारवाईस तात्पुरती स्थगिती देऊन प्रत्येक प्रकरणाची प्रत्यक्ष पडताळणी व सुनावणी घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे इंदापूर तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांनी इंदापूर तहसील कार्यालयास निवेदनाव्दारे केली आहे. इंदापूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अधिकारी सुधीर जायभाय यांच्याकडे श्री. रणवरे व सहकाऱ्यांनी निवेदन सादर केले. रेशनच्या माध्यमातून मिळणारे धान्य हे गरीब, अल्पभूधारक, शेतमजूर, कामगार, ज्येष्ठ नागरिक तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे केवळ संगणकीय नोंद, आधार किंवा ई के वाय सी मधील त्रुटी, दुबार नोंद अथवा अन्य तांत्रिक कारणांमुळे पात्र कुटुंबांचा रेशनचा लाभ अचानक बंद होऊ नये, अशी भूमिका रणवरे यांनी निवेदनातून मांडली आहे. एखादा लाभार्थी अपात्र असल्याचा निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधित कुटुंबाची कागदपत्रे तपासण्यात यावीत, त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा तसेच आवश्यक असल्यास प्रत्यक्ष चौकशी करण्यात यावी. त्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नोटिसांमागील शासन आदेश, निकष व कारणे प्रशासनाने नागरिकांसमोर स्पष्ट करावीत तसेच प्रत्येक रेशनकार्डधारकाला वैयक्तिक सुनावणीची संधी देऊन आधार, ई केवायसी उत्पन्न, कुटुंबातील सदस्यांची नोंद किंवा इतर तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांचे रेशनकार्ड किंवा धान्याचा लाभ अंतिम निर्णय होईपर्यंत बंद करू नये, तसेच मृत व्यक्तींची नावे, दुबार नोंदणी किंवा अन्य कारणांमुळे नावे कमी करावयाची असल्यास स्वतंत्र पडताळणी करून संबंधित कुटुंबाला माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील रेशनकार्डधारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाने विशेष शिबिर आयोजित करावे, अशीही मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय काळे यांच्या उपस्थितीत सुदर्शन रणवरे यांनी केली. पात्र असूनही केवळ तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणामुळे कोणतेही कुटुंब अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे त्यांनी निवेदनातून स्पष्ट केले. यावेळी रेशनकार्डधारकांच्या हितासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन प्रत्येक प्रकरणाची निष्पक्ष पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय काळे, युवासेना तालुकाप्रमुख सचिन इंगळे, शहरप्रमुख अविनाश खंडाळे, शहर संघटक देवा मगर, दत्ता खुडे, उपशहरप्रमुख युवराज लोंढे, विष्णू चोरमले, स्वप्नील उतेकर, विजयसिंह चोरमले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा