*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
-----: दिवाळीच्या लक्ष्मी पुजनास लागणाऱ्या लाह्या बत्ताशांबरोबरच केरसुणीला (लक्ष्मी) महत्त्व आहे. लक्ष्मीचे प्रतीक मानली जाणारी ही केरसुणी बनवण्याची लगबग सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत केरसूणी विक्री दरात वाढ करणे अपेक्षित झाले आहे. तर साखरेच्या दरवाढीमुळे लाह्या बत्ताशांच्या दरातही वाढ झाली आहे.
केरसुणी बनवण्यासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक मधून येणाऱ्या कच्च्या मालाच्या भावात पेंडीमागे तीस रुपयांची वाढ झाल्याने दरवाढ होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानाच्या युगात सफाईची विविध साधने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, दिवाळीच्या सणाला केरसुणीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. प्रथेप्रमाणे पूजा करण्यासाठी केरसुणीचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
पूर्वी साफसफाई करण्यासाठी झाडू म्हणून झाडांच्या (झावळ्याच्या) पानांचा वापर केला जायचा. ही केरसुणी सुतळी व वाकाचे घायपातीच्या सहाय्याने बांधल्या जात. पण सध्या नायलॉन दोरीच्या साह्याने केरसुणी आवळून बांधण्यात येत असल्याने ही बाब खर्चीक बनली आहे. याबाबत वंदना साठे म्हणाल्या, आमचा बाराही महिने केरसुणी विक्रीचा व्यवसाय असून दिवाळीत २००० ते ३००० केरसुणींना मागणी असते. कच्च्या मालाच्या एका पेंडीचा दर मागील वर्षीच्या तुलनेत ३० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे केरसुणीच्या किमतीतही वाढ झाली आहे. मोठी केरसुणी एकशे वीस रुपये, मध्यम शंभर रुपये तर लहान सत्तर ते ऐंशी रुपये अशा दरात विकावी लागत आहे.
केरसुणी विक्रेते शोभा मोहिते म्हणाल्या, सध्याला आपल्या परिसरात कच्चा माल सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्यातच दिवसेंदिवस शिंदोळीच्या झाडांची संख्या कमी होत असल्याने कच्च्या मालाचे दर वाढत आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून कच्चामाल माढा तालुक्यातील लऊळ येथे आणण्यात येतो. तिथे जाऊन तो घेऊन यावे लागते.
केरसुणी विक्रेते अर्जून खंडागळे म्हणाले, मागील वर्षीच्या तुलनेत डिझेलचे दर वाढले असल्याने कच्चा माल आणण्यासाठीचे भाडे वाढले आहे. तसेच परीसरातील गावे व बाजारात जाऊन माल विकावा लागतो आहे. त्यामुळे केरसूणी विक्रीच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत थोडी वाढ करणे आवश्यक झाली आहे.
साखरेच्या दरवाढीमुळे लाह्या बत्ताशांच्या दरातही वाढ करावी लागत असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 50% ची दरवाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ विक्रीतही वाढ करावी लागत असल्याचे व्यापारी एहसान मुलाणी यांनी सांगितले. त्यातच दुष्काळी परिस्थिती असून मालाला म्हणावी तशी मागणी नसण्याचे एहसान मुलाणी यांनी सांगितले.
फोटो - अकलूज येथील सातपुते आजी केरसूणी (लक्ष्मी) विक्री करत असल्याचे दिसत आहे.
---------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा