Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२६

रेडा गावातील पवार कुटुंबाचा वारकरी परंपरेचा वसा; तिसऱ्या युवा पिढी कडून चार दशकांपासून वैष्णवांची अखंड सेवा, भक्ती, परंपरा अन् सेवाभावाचा अनोखा संगम! कोल्हापुरी फेटे, चहापाणी, फटाक्यांची आतषबाजी अन् तोफांच्या सलामीने श्री क्षेत्र नागेश्वर दिंडीचे जंगी स्वागत.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



'पंढरीची वारी, आहे माझे घरी। आणि नित्य दिवाळी, दसरा।। मुखी नाम विठ्ठलाचे, हृदयी भाव भक्तीचा। सेवा घडो वैष्णवांची, हाच ध्यास जन्मोजन्मीचा।।'

वारकरी संप्रदाय म्हणजे केवळ पंढरपूरची पायी वारी नव्हे, तर भक्ती, श्रद्धा, समर्पण, बंधुभाव आणि निःस्वार्थ सेवेची अखंड परंपरा होय! याच वारकरी विचारांचा वसा जपत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रेडा गावातील पवार कुटुंबाने तब्बल चार दशकांहून अधिक काळापासून वैष्णव सेवेचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर, कौठा ते पंढरपूर या ४९ व्या वर्षातील कार्तिकी पायी दिंडी सोहळ्याचे रेडा गावात आगमन होताच पवार कुटुंबीयांनी केलेल्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण स्वागताने संपूर्ण दिंडीतील वारकरी अक्षरशः भारावून गेले. कोल्हापुरी फेटे, चहा पाणी, फटाक्यांची आतषबाजी आणि तोफांच्या सलामीने अवघे वातावरण विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले



अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कौठा येथून गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिकी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी रेडा गावात आगमन झाले. यावेळी पवार कुटुंबाचे प्रमुख तथा माजी ग्रामपंचायत सदस्य सुखदेव पवार आणि सचिन आत्माराम चौगुले यांनी दिंडी सोहळ्याचे प्रमुख व मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले. पवार कुटुंबातील महिलांनी तुळशीपूजन करून दिंडीतील महिला वारकऱ्यांचे औक्षण केले. दिंडीतील महिला वारकरी आणि मानाच्या मानकऱ्यांना कोल्हापुरी फेटे बांधून सन्मानित करण्यात आले. या अनोख्या स्वागताने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होते.


रेडा गावातील पवार कुटुंबाने जपलेली ही परंपरा केवळ स्वागतापुरती मर्यादित नसून ती श्रद्धा, संस्कार आणि वैष्णव सेवेच्या भावनेतून फुललेली आहे. कुटुंबातील तिसऱ्या युवा पिढीनेही हा वारसा तितक्याच निष्ठेने पुढे चालविला आहे. सुखदेव पवार यांची मुले, मुली, सुना, नातवंडे आणि पत्रकार कैलास पवार यांच्यासह संपूर्ण पवार परिवार दरवर्षी दिंडी सोहळ्याच्या स्वागतासाठी एकत्र येतो. प्रत्येक वर्षी स्वागतामध्ये वेगळेपण जपत वारकऱ्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.

'नाही पाहिला भेद कुणाचा, नाही अपेक्षा मानाची।

विठ्ठलाच्या भक्तांसाठी, सेवा हीच पूजा मनाची।।

चरणी ठेवुनी श्रद्धाभाव, करू वैष्णवांचा सन्मान।

पवार घराण्याचा सेवावसा, राहो अखंड पिढ्यान्पिढ्यांचा अभिमान।।'

*रेडा गावात आल्यावर घरच्यासारखे वाटत असल्याचे दिंडी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. रावसाहेब शिपलकर (गुरुजी) यांनी  सांगितले. श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर कौठा ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचे हे ४९ वे वर्ष आहे. ऊन, वारा, पाऊस आणि संसाराची कोणतीही तमा न बाळगता केवळ पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पायी प्रवास करतात. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ रेडा ग्रामस्थ ज्या प्रेमाने आणि आपुलकीने दिंडीचे स्वागत करतात, त्यामुळे आम्ही सर्व वारकरी भारावून जातो. रेडा गावात आल्यानंतर स्वतःच्या घरी आल्यासारखा अनुभव येतो. पवार कुटुंबातील तिसऱ्या युवा पिढीने चार दशकांपासून जपलेली ही वैष्णव सेवेची परंपरा ही साधी गोष्ट नाही. अनेक जन्मांचे पुण्य गाठीशी असल्याशिवाय अशी सांप्रदायिक वृत्ती आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची भावना निर्माण होत नाही. परमेश्वराच्या भेटीच्या ओढीने प्रत्येक वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतो, असे त्यांनी नमूद केले.

दिंडी सोहळ्याला प्रेरणा देणारे गुरुवर्य निवृत्ती (आण्णा) शिपलकर आणि वै. गुणाईमाता निवृत्ती शिपलकर यांच्या प्रेरणेतून गेली ४९ वर्षे हा पायी वारीचा सोहळा अखंड सुरू आहे. या दिंडीमध्ये ह.भ.प. दत्तात्रय महाराज शिपलकर, सोमनाथ महाराज शिपलकर, रावसाहेब शिपलकर (गुरुजी), भानुदास दातीर महाराज, हरी घोडके, विणेकरी कुमार काका कुलकर्णी, चोपदार हनुमंत नारायण शिपलकर, प्रसिद्ध पखवाजवादक ऋषिकेश शिपलकर, संतोष गरुड, बाळासाहेब ढोके, वामन रांहीज, भीमसेन खरात, बाळासाहेब लगड, कैलास देशमुख, प्रकाश परकाळे, मंगल मोटे, सुरेखा जठार, वनिता गिरमकर, सविता पवार, स्पीकर व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे संजय पवार आदी वारकरी सहभागी आहेत. यावेळी ह.भ.प. बबन पवार महाराज (ट्रेलर) आणि बाळासाहेब नागवडे यांनी बहारदार गवळणी, भारूड आणि भजनांचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांना भक्तिरसात चिंब केले. विठ्ठलनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि अभंगांच्या स्वरांनी परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.

ह.भ.प. दत्तात्रय शिपलकर  रेडा ग्रामस्थांच्या स्वागता विषयी म्हणाले, गेली ४२ वर्षे रेडा गावातील ग्रामस्थ अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने आमच्या दिंडी सोहळ्याचे स्वागत करतात. दिंडी प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंत अनेक ठिकाणी मुक्काम आणि स्वागत होत असले, तरी रेडा गावातील पवार परिवाराचे स्वागत आणि सेवा यांचे वेगळेच स्थान आहे. पवार कुटुंबाचे प्रमुख सुखदेव पवार, त्यांची मुले, मुली, सुना, नातवंडे आणि त्यांचे पुत्र, पत्रकार कैलास पवार हे दरवर्षी अतिशय मोठ्या उत्साहाने दिंडीचे स्वागत करतात. प्रत्येक वर्षी स्वागतामध्ये नवनवीन उपक्रम राबविले जातात. यंदाही कोल्हापुरी फेटे, फटाक्यांची आतषबाजी आणि सन्मानपूर्वक केलेल्या स्वागताने संपूर्ण दिंडीतील वारकरी सुखावून गेले. रेडा गावातील पवार कुटुंबाचे प्रेम आणि आपुलकी कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.

पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर दिंडी सोहळ्याचा चार दिवसांचा मुक्काम संत राज मठ येथे असणार आहे. त्यानंतर नगरप्रदक्षिणा आणि गोपाळकाल्याचा सोहळा पार पडल्यानंतर दिंडीचा परतीचा प्रवास श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर, कौठा येथे सुरू होणार आहे.

पवार कुटुंबीयांनी यावेळी विठ्ठल चरणी प्रार्थना व्यक्त करताना शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समाधान व शांती नांदो, सर्वांना चांगले दिवस येवोत आणि जन्मोजन्मी आपल्या घराण्याकडून वैष्णवांची सेवा घडत राहो, अशी मनोभावे इच्छा व्यक्त केली.

दरम्यान, रेडा गावातील पवार कुटुंबाचा पाहुणचार आणि प्रेमळ स्वागत स्वीकारल्यानंतर श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळा पुढील मुक्कामासाठी रेडा येथील जालिंदर देवकर यांच्या निवासस्थानी मार्गस्थ झाला. वारकरी संप्रदायातील भक्तीभाव, पिढ्यान्पिढ्या जपलेले संस्कार आणि निःस्वार्थ सेवेचा सुंदर संगम या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.

सोबत फोटो:-

फोटो ओळ : रेडा ( ता. इंदापूर) येथे श्रीगोंदा तालुक्यातील कौठा येथून प्रस्थान करणाऱ्या श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे चार दशकांपासून स्वागत करताना पवार कुटुंबाचे प्रमुख सुखदेव पवार व सदस्य (छायाचित्र : पी.के.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा