पुणे डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
पुणे बावधन येथील चांदणी चौकातील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा २५५३ वा मोक्ष-निर्वाण कल्याणक महोत्सव भगवान महावीर यांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त जैन मंदिराला नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीर यांचा अभिषेक तसेच महा शांतीधारा करण्यात आली. यावेळी भगवान महावीर यांचे पूजन, अष्टक, महावीराष्टक, स्तोत्र, निर्वाणकांड चे सामूहिक पठण करुन भगवान महावीर यांची महामंगल आरती करण्यात आली.
या निमित्ताने महापुराणम् या जैन धर्म शास्त्राचे प्रकाशन करण्यात आले.
त्यानंतर भगवान महावीर यांची प्रतिमा व जिनवाणी घेऊन जैन श्रावकांनी मंदिर परिक्रमा करत "महावीर मोक्षा गेले, जयदेव बोला आंनद झाला" चा जयघोष करून दिगंबर जैन समाजातील सर्वांनी निर्वाण लाडू चढवून मोठ्या आनंदाने मोक्ष निर्वाण कल्याणक महोत्सव साजरा केला.
यानंतर दिवाळी निमित्त पुणे पत्रकार संघ सकाळचे बातमीदार जितेंद्र मैड, पुढारीचे बातमीदार दीपक पाटील, लोकमतचे बातमीदार विशाल सातपुते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेह-मिलन व फराळ कार्यक्रम संपन्न झाला.
सायंकाळी महादीपोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर महामंगल आरती संपन्न झाली. या सर्व कार्यक्रमांमध्ये कोथरूड, पौड रोड, वारजे, बावधन, बाणेर आदी भागातील दिगंबर जैन समाजातील बहुसंख्य जैन बांधव सहभागी झाले होते.
हा निर्वाण कल्याण महोत्सव यशस्वी करण्यासाठी भगवान महावीर मंडळ, पुणे व श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर विश्वस्त कमिटी, विश्वस्त उदय लेंगडे, अशोक मगदूम, सुनील बिरनाळे, प्रीतम मेहता, अभिजीत शहा, अमित गांधी, प्रकाश कुडचे, विशाल दगडे, दिनेश गणेशवाडे, मोहन कुडचे, केतन खापरे, चेतन जैन आदींनी प्रयत्न केले.
यावेळी प्रीतम मेहता म्हणाले, भगवान महावीर मंडळ, पुणे व जयसिंगपूर येथील शांती विद्या ज्ञानवर्धन संस्थेच्या पुढाकार, सहकार्य तसेच श्रावकांच्या साथीने तब्बल
१२६ वर्षांनंतर ‘भगवंत जिनसेनाचार्य कृत महापुराण’चा मराठी अनुवाद पुनर्प्रकाशित करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
भगवान जिनसेनाचार्य कृत *महापुराण* या संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद तब्बल १२६ वर्षांनंतर पुनर्प्रकाशित करण्यात आल्याने जैन समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुमारे ३५०० पृष्ठांचा हा महत्त्वपूर्ण ग्रंथ सन १८९९ मध्ये पंडित कल्लप्पा लिट्टे शास्त्री यांनी मराठीत अनुवादित करून प्रकाशित केला होता. सन २०२१ मध्ये या ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनाचा संकल्प परमपूज्य १०८ श्री अभयसागरजी महाराज यांनी केला. या कार्यासाठी परमपूज्य आचार्य १०८ श्री विद्यासागरजी महाराज व परमपूज्य आचार्य १०८ श्री समयसागरजी महाराज यांचे पावन आशीर्वाद लाभले.
ग्रंथातील काही मध्यवर्ती पृष्ठे उपलब्ध नसल्याने श्री बाहुबली संस्था, कुंभोज तसेच श्री नांदणी भट्टारकजी महाराज संस्थान यांच्याकडून ती मिळविण्यात आली. या कार्यासाठी शांती विद्या ज्ञानवर्धन संस्था, जयसिंगपूर आणि भगवान महावीर मंडळ, पुणे यांचे विशेष योगदान लाभले.
ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनासाठी अनेक श्रावकांनी आर्थिक सहकार्य केले. यासाठी विशेष योगदान भरतराज शाह परिवार, पुणे आणि डॉक्टर शशांक जैन, पनवेल -मुंबई यांचे लाभले. ग्रंथाचे मुद्रण अजित पाटील, समय क्रिएशन, जयसिंगपूर यांनी पूर्ण केले. ग्रंथाच्या मुद्रण संशोधनासाठी पहिल्या व दुसऱ्या भागाचे कार्य अजित पाटील, ब्र. विद्युताई चौगुले आणि डॉ. संजय शाह, पुणे यांनी केले. चौथा व पाचवा भाग के. मोहनीजी जैन धरनगावकर यांनी तर तिसरा भाग श्रेणिक अन्नदाते डोंबिवली यांच्या प्रकाशन संस्थेने पूर्ण केला. सदर ग्रंथ ‘पाच ग्रंथांमध्ये’ प्रकाशित करण्यात आला असून, महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिरात स्वाध्यायासाठी मागणीनुसार उपलब्ध करून दिला जाणार आहे. स्वाध्यायासाठी हवा असल्यास हा ग्रंथ मूल्यामध्ये तसेच पुनर्मुद्रणाच्या राशीमध्ये उपलब्ध राहणार आहे.
जैन धर्मग्रंथांचे जतन, संवर्धन आणि भावी पिढ्यांपर्यंत त्यांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा