इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापूर तालुक्यात पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या डाळज नं. २ आणि पळसदेव येथील एसटी बसथांब्यांवर प्रवाशांसाठी निवारा शेड उभारण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्राचे उपसमन्वयक भूषण सुर्वे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुणे विमानतळावर भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
डाळज नं. २ आणि पळसदेव ही दोन्ही गावे लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाची असून या परिसरातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच सर्वसामान्य प्रवासी इंदापूर, बारामती पुणे आणि सोलापूर या शहरांकडे एसटी बसने प्रवास करतात. या महामार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस या ठिकाणी थांबत असल्या, तरी प्रवाशांसाठी बसथांब्यावर कोणतीही निवारा व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यात कडक उन्हात तर पावसाळ्यात पावसात भिजत प्रवाशांना महामार्गावर उभे राहून एसटी बसची वाट पाहावी लागते. अनेकदा बस थांबवण्यासाठी रस्त्यावर उभे राहून हात दाखवावा लागतो. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी, यासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून यापूर्वीही अनेकदा निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप बसथांबा शेडचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. ही बाब गांभीर्याने घेत शिवसेना सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख महादेव सलवदे व उपसमन्वयक भूषण सुर्वे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुणे विमानतळावर रात्री भेट घेत डाळज नं. २ आणि पळसदेव येथील प्रवाशांची व्यथा त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच दोन्ही ठिकाणी एसटी बसथांबा शेड तातडीने मंजूर करून उभारण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाची दखल घेत यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी व्यक्त केली.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला आता वरिष्ठ स्तरावरून गती मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली असून, डाळज नं. २ आणि पळसदेव येथील एसटी प्रवाशांना लवकरच हक्काचा निवारा मिळेल, अशी आशा ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा